नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवव्यांदा ध्वजारोहण करण्यात आले आहे. ध्वजारोहण केल्यानंतर नरेंद्र मोदींनी संबोधनाला सुरुवात केली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मी जगभरातील भारतप्रेमींना, भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो, असं नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम सांगितलं. तसेच केवळ भारताच्या कानाकोपऱ्यातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यात हा तिरंगा अभिमानाने फडकत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी भाषणात म्हटलं आहे.
भारतीय जनतेतील सामूहिकतेची भावना पुन्हा एकदा जागृत झाली आहे. हर घर तिरंगाच्या माध्यमातून लोकांमध्ये चेतना निर्माण झाली. देशामध्ये किती सामर्थ्य आहे हे तिरंग्याच्या माध्यमातून जगाला समजले आहे. थाळी, टाळ्या वाजवून देशातील नागरिकांनी कोरोना योद्धांना पाठिंबा दिला. यातून चेतना निर्माण झाल्याचं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. तसेच भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे. संपूर्ण जग आता भारताकडे गर्वाने, अपेक्षाने पाहतोय, असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.
भारत ही लोकशाहीची जननी आहे. भारताने आपल्या ७५ वर्षांच्या प्रवासात अनेक आव्हानांना तोंड देत आपल्याजवळ मौल्यवान क्षमता असल्याचं सिद्ध केलं आहे. २०१४ मध्ये देशातील जनतेने मला जबाबदारी दिली. स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेली मी पहिली व्यक्ती आहे ज्याला लाल किल्ल्यावरुन लोकांना संबोधित करण्याची संधी मिळाली . आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताच्या विकासाच्या मार्गावर अनेकांनी शंका घेतली. पण, या भूमीतील लोकांमध्ये काहीतरी वेगळं आहे हे त्यांना माहित नव्हतं. ही माती खास आहे हे त्यांना माहित नव्हतं, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
भारतातील असा एकही कोपरा नव्हता, असा कोणताही काळ नव्हता, जेव्हा देशवासियांनी शेकडो वर्षे गुलामगिरीविरुद्ध लढा दिला नाही, आपले आयुष्य पणाला लावलं नाही, यातना सहन केल्या नाहीत. आज सर्व देशवासियांना अशा प्रत्येक महापुरुषाला, प्रत्येक बलिदानाला आणि त्याग करणाऱ्या प्रति नतमस्तक होण्याची संधी आहे. स्वातंत्र्यसैनिकांचे संकल्प पूर्ण करण्याची आपल्याला संधी आहे, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं.