नवी दिल्ली - देशभरात मोठ्या उत्साहात, आनंदात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. असं असतानाच आता एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. रीयूनियन हे नेहमीच स्पेशल असतं. अनेक वर्षांनंतर अचानक जेव्हा पुन्हा भेट होते. तेव्हा जो आनंद काही वेगळाच असतो. फाळणीत वेगळे झालेल्या दोन भावांची तब्बल 70 वर्षांनी भेट झाली आहे. 1947 मध्ये फाळणी झाल्यानंतर भारतीय असलेले सिका खान हे आपल्या पाकिस्तानी भावाला पहिल्यांदाच आता भेटले. ही घटना पाहिल्यावर सर्वच जण भावूक झाले. सिका हे शीख मजूर होते. फाळणी झाली तेव्हा ते फक्त सहा महिन्यांचे होते. तेव्हाच मोठा भाऊ सादिक खान पासून ते वेगळे झाले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात फाळणी झाली तेव्हा दोन्ही भाऊ वेगळे झाले. जातीय हत्याकांडात सिका यांचे वडील आणि बहिणीचा मृत्यू झाला. त्यावेळी सादिक पळून पाकिस्तानात पोहोचले. पंजाबमधील भटिंडा येथे आपल्या साध्या विटांच्या घरात राहणाऱ्या सिका यांनी दिलेल्या माहितीनुसार, "माझ्या आईला हा आघात सहन झाला नाही आणि तिने नदीत उडी मारून आत्महत्या केली."
"मला लहान असल्यापासूनच गावकरी आणि काही नातेवाईकांत सोडून देण्यात आले होते, ज्यांनी मला वाढवले". आपल्या भावाबद्दल अधिक जाणून घेण्याची सिकाची इच्छा लहान असल्यापासूनच होती. तीन वर्षांपूर्वी या भागातील एका डॉक्टरने मदत केली. पाकिस्तानी यूट्यूबरनासीर ढिल्लन यांच्या अनेक फोन कॉल्स आणि मदतीनंतर सादिक आणि सिक यांना पुन्हा एकत्र आणले. त्यांची भेट घडवून आणली.
38 वर्षीय नासीर म्हणतात की, त्यांनी आणि त्यांचा शीख मित्र भूपिंदर सिंग यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून 300 कुटुंबांना पुन्हा एकत्र आणले आहे. दोन्ही देशांमध्ये शत्रुत्व असले तरी 2019 मध्ये हा कर्तारपूर कॉरिडोर खुलं करून देण्यात आलं होतं. कर्तारपूर कॉरिडोरमध्ये या बांधवांची भेट झाली. व्हिसा-मुक्त क्रॉसिंग जे भारतीय शीख यात्रेकरूंना पाकिस्तानमधील मंदिराला भेट देण्यासाठी दिले जाते त्या माध्यमातून या भावंडांची भेट झाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.