Independence Day 2024 : रायपूर : भारत आज (१५ ऑगस्ट) आपला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनी देशभरात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान, स्वातंत्र्यदिनिमित्त देशातील प्रत्येक शहरांसह गावागावांत आजच्या दिवशी तिरंगा फडकवला जातो. मात्र, छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर भागातील अशी १३ गावं आहेत, जिथे पहिल्यांदाच तिरंगा फडकवला जाणार आहे.
वृत्तानुसार, छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर भागातील १३ गावांमध्ये गुरुवारी प्रथमच राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे. बुधवारी याबाबत माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गेल्या ७ महिन्यांत या गावांमध्ये सुरक्षा दलाच्या नवीन छावण्या उभारण्यात आल्यानंतर या भागात विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
बस्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितलं की, गुरुवारी नेरलीघाट (दंतेवाडा जिल्हा), पाणिडोबीर (कांकेर), गुंडम, पुटकेल आणि चुटवाही (विजापूर), कस्तुरमेट्टा, मसपूर, इराकभट्टी आणि मोहंडी (नारायणपूर), टेकलगुडेम, पुवर्ती लखापाल आणि पुलनपड (सुकमा) गावात पहिल्यांच तिरंगा फडकवला जाईल.
या गावांमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम यापूर्वी कधीही आयोजित करण्यात आला नसल्याचं सुंदरराज पी. यांनी सांगितलं. ते म्हणाले की, गेल्या प्रजासत्ताक दिनानंतर या ठिकाणी सुरक्षा शिबिरे लावण्यात आली होती. नवीन छावण्या उभारल्यानंतर या परिसराला नवी ओळख मिळाली आहे.
याचबरोबर, शिबिर शांतिपूर्ण आणि समृद्ध बस्तर तयार करण्यासाठी तरुण आणि वृद्धांसाठी आशेचा किरण म्हणून काम करतील. शिबिरे सरकारी कल्याणकारी योजना लोकांपर्यंत, मुख्यत: आदिवासींपर्यंत पोहोचवण्यास मदत करत आहेत आणि त्या भागाच्या विकासाचा मार्गही मोकळा करत आहेत, असं सुंदरराज पी. यांनी सांगितलं.
दरम्यान, स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी छत्तीसगड राज्य सरकारनं राजधानी रायपूरसह सर्व जिल्ह्यांमध्ये तयारी पूर्ण केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री विष्णुदेव साई गुरुवारी सकाळी रायपूरच्या पोलीस परेड मैदानावर राष्ट्रध्वज फडकवतील. तर उपमुख्यमंत्री अरुण साओ बिलासपूरमध्ये, विजय शर्मा जगदलपूरमध्ये (बस्तर जिल्ह्याचे मुख्यालय) आणि केंद्रीय राज्यमंत्री तोखान साहू मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर जिल्ह्यात राष्ट्रध्वज फडकावतील.
राज्यातील विविध ठिकाणी होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात इतर मंत्री आणि आमदार सहभागी होणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच, गुरुवारी स्वातंत्र्य दिनाचा उत्सव लक्षात घेऊन राज्यात विशेषत: नक्षलग्रस्त भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे, असं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.