इंदोर : देशाचा 72वा स्वातंत्र्य दिवस आपण उद्या देशभरात साजरा करणार आहोत. पण तीन दशकांच्या जुन्या परंपरेनुसार, मध्यप्रदेशच्या मन्दसौर शहरातील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिरामध्ये स्वातंत्र्य दिवस पाच दिवस आधी म्हणजेच 10 ऑगस्ट रोजीच साजरा करण्यात आला.
इंदोरपासून जवळपास 250 किलोमीटर लांब असणाऱ्या मंदसौरमध्ये शिवना नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या, या प्राचीन मंदीरामध्ये स्वातंत्र्य दिवस हिंदू पंचांगानुसार साजरा करण्यात आला.
पशुपतिनाथ मंदिराचे पुरोहित आणि ज्योतिष व कर्मकांड परिषदेचे अध्यक्ष उमेश जोशी यांनी सांगितल्यानुसार, 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला त्यावेळी हिंदू पंचांगानुसार, श्रावण मासातील कृष्ण पक्ष चतुर्दशी होती. त्यामुळे पशुपतीनाथ मंदीरामध्ये याच तिथीनुसार पूजा अर्चना करून स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येतो.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही म्हणून पाच दिवस आगोदर तिथीनुसार स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी देवाची पूजा अर्चना करण्यात आली. तिथीनुसार साजरा करण्याची परंपरा या ठिकाणी 1987 पासून सुरू आहे.