नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिवसाला अवघे दोन दिवस राहिले असताना बाजारात दरवर्षीप्रमाणे दिसणारे प्लॅस्टिकचे झेंडे मात्र गायब झाले आहेत. स्वातंत्र्यदिनाचे वातावरण बाकी नेहमीसारखेच आहे. मात्र, हा मोठा बदल बरेच काही सांगून जात आहे. आज जागोजागी प्लॅस्टिकऐवजी कापडी झेंडे विक्रीस आले आहेत. केवळ महाराष्ट्रात प्लॅस्टिकबंदी असली तरीही देशभरातही हे झेंडे गायब का आहेत माहितीये....चला जाणून घेऊया.
गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पुढील वर्षीपासून प्लॅस्टिकचे झेंडे न वापरण्याचे आवाहन केले होते. कार्यक्रम झाल्यानंतर हेच झेंडे रस्त्यावर, गटारीसह इतस्तत: फेकले जातात. यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. देशाच्या राष्ट्रधवज नष्ट करण्यासाठी एक नियमावली आहे. मात्र, अशाप्रकारे राष्ट्रध्वज रस्त्यावर फेकल्याने तो लोकांच्या पायाखाली येतो. याचबरोबर प्लॅस्टिक हे पर्यावरणालाही घातक आहे. या प्लॅस्टिकमुळे प्राण्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. यामुळे कागदी किंवा प्लॅस्टिकचे झेंडे वापरण्याचे आवाहन मंत्रालयाने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना केले होते.
या सर्वाच्या पार्श्वभुमीवर देशात प्लॅस्टिकच्या झेंड्यांनी बंदी घातलेली नसली तरीही विक्रेत्यांनी मात्र लोकांची धास्ती घेतलेली आहे. प्लॅस्टिकचे झेंडे विकताना दिसल्यास लोकच या विक्रेत्यांना सुनावत आहेत. तर काही जण सोशल मिडियावर त्याचा व्हिडिओ टाकताना दिसत आहेत. याची धास्ती घेऊन विक्रेत्यांनीच यंदा प्लॅस्टिक ऐवजी कापडी झेंडे विकण्याचे ठरविले आहे.
तिरंग्यांची सर्वात जास्त विक्री रस्त्या-रस्त्यांवर सिग्नलवर जास्त होते. मात्र, याठिकाणीच विक्रेत्यांना मानहानीला सामोरे जावे लागतेय. कारचालकांना झेंडे देण्यास गेल्यास ते काच खाली करून सुनावतात आणि फोटो काढायला लागतात, असे एका विक्रेत्याने सांगितले.