नवी दिल्ली - आज देशाचा 73 वा स्वातंत्र्य दिन आहे. देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असतं. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असतं. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गुगलने एक खास डुडल तयार करून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गुगलने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कलात्मक रचना असलेले एक खास डुडल तयार केले आहे. यामध्ये संसद, भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ, चांद्रयान-2, मेट्रो, हस्तकला यांची झलक पाहायला मिळत आहे. शैवालिनी कुमार यांनी हे खास डुडल तयार केले आहे. भारताचा ऐतिहासिक वारसा आणि संस्कृतीचं दर्शन डुडलमधून घडत आहे. 73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो.
देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची मूल्ये सांगणारा तिरंगा प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना निर्माण करतो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे बळकट लोकशाहीचे विचार रूजविणारा तिरंगा स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाच्या हातात अभिमानाने मिरवला जातो. राष्ट्रध्वजातील रंगांचा अर्थ, झेंडा फडकवताना कोणते नियम आहेत हे जाणून घेऊया....
राष्ट्रध्वजातील रंगांचा अर्थ
- भगवा किंवा केशरी हे त्याग आणि धैर्याचं प्रतीक आहे.
- पांढरा प्रकाश, शांती आणि सत्याची भावना व्यक्त करणारा आहे.
- हिरवा समृद्धी आणि निसर्गाचे भूमीशी असलेले नाते व्यक्त करणारा रंग आहे.
- झेंड्यातील मधले निळे अशोकचक्र हे सागराची अथांगता आणि कालचक्राचे द्योतक आहे. हे अशोकचक्र म्हणजे जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे बौद्ध धर्माचे प्रतीक असलेले धम्मचक्र आहे.
राष्ट्रध्वजासंबंधी नियम
भारताचा राष्ट्रध्वज कसा असावा, कसा वापरावा आणि कधी वापरावा यासंदर्भात भारतीय घटनेने काही नियम ठरविले आहेत.
– भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण 3:2 असे आहे.
– राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडापासून बनवला जावा असा सरकारी नियम आहे
– ध्वज फडकवताना तो सगळ्यांना दिसेल अशा सन्मानपूर्वक उच्च स्थानावरून फडकविला जावा
– ध्वज फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.
– शासकीय इमारतींवर कोणत्याही हवामानात तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकत राहावा व सूर्यास्तानंतर उतरविताना बिगूल वाजवून अगदी हळूहळू आदरपूर्वक उतरविला जावा.
– केवळ प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनादिवशीच तो फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो.
– राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत.