नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिवस उद्यावर आला असताना राजधानी नवी दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवाई दलाच्या जवानाच्या वेशामध्ये एक संशयित दहशतवादी फिरत असल्याच्या वृत्ताने खळबळ माजली आहे. रविवारी सायंकाळी एक व्यक्ती राजीव चौक मेट्रो स्टेशनजवळ संशयास्पदरित्या फिरताना दिसला होता. यानंतर त्याचा शोध सुरु करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनावेळी दिल्लीसह देशभरात घातपात घडविण्यासाठी जैश-ए- मोहम्मद या आतंकवादी संघटनेचे दहशतवादी घुसल्याचे वृत्त काही दिवसांपुर्वीच सुरक्षा यंत्रणांनी दिले होते. यामुळे सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. रविवारी सायंकाळी एअर फोर्सच्या एका निवृत्त अधिकाऱ्याने या संशयित व्यक्तीला हवाई दलाच्या वेशामध्ये पाहिले होते. मात्र, या संशयिताने गणवेशासोबत स्पोर्ट शुज घातले होते. निवृत्त अधिकाऱ्याला ही बाब खटकली. कारण भारतीय सेनांचे अधिकारी कधीही सरकारी गणवेशावर स्पोर्ट शुज घालत नाहीत. त्यांनी विनाविलंब पोलिसांना याची खबर दिली. मात्र, तोपर्यंत संशयित व्यक्ती तेथून निसटला होता.
गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार जैश-ए- मोहम्मद चे दहशतवादी प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियनच्या वेशामध्ये येण्याची शक्यता आहे. यानुसार लाल किल्ल्याजवळील सर्व पाईपलाईन आणि इलेक्ट्रीक मिटररांची तपासणी केली जात आहे.
याचबरोबर पोलिसांनी पतंग पकडणाऱ्यांचीही सोय केली आहे. गेल्या वर्षी ध्वजारोहनावेळी पंतप्रधान मोदी यांच्या जवळ एक पतंग पडला होता. तसेच आजुबाजुच्या लोकांना 15 ऑगस्टला पतंग न उडविण्याबाबत सांगण्यात आले आहे. परिसरात 1000 सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. तसेच 40 हजार पोलिसांसह निमलष्करी दलाच्या 35 तुकड्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आल्या आहेत.