नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांच्यावर झालेले लैंगिक आरोपाचं खंडन करत न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. पुढील आठवड्यापर्यंत सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे जाणूनबूजून माझ्यावर असले आरोप लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं रंजन गोगोई यांनी सांगितलं आहे.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात एका महिलेने सुप्रीम कोर्टाच्या 22 न्यायाधीशांना पत्र लिहून आपले लैंगिक छळाचा आरोप केला होता. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या विशेष खंडपीठाने सुनावणी केली. यावेळी सरन्यायाधीशांनी प्रश्न उपस्थित करत म्हणाले की, मुख्य न्यायाधीश म्हणून 20 वर्ष मी केलेल्या सेवेचं हे बक्षिस आहे का? 20 वर्षानंतर आजही माझ्या खात्यात फक्त 6 लाख 80 हजार रुपये आहेत. एवढचं काय तर माझ्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्याकडेही माझ्याहून अधिक पैसे आहेत. माझ्यावर कोणीही आर्थिक आरोप करु शकत नाही म्हणून या प्रकारचा आरोप लावला जात आहे. न्यायव्यवस्थेला कोणीही बळीचा बकरा बनवू शकत नाही असंही गोगोई यांनी सांगितले.
या षडयंत्रामागे मोठ्या शक्तीचा हात मुख्य सरन्यायाधीश यांनी पुढे असंही सांगितले की, या आरोपांमागे कोणी एक व्यक्ती नसून यामध्ये खूप जणांचा हात आहे. या षडयंत्रामागे मोठी शक्ती आहे. त्या लोकांना सरन्यायाधीशांचं कार्यालय निष्क्रिय असल्याचं दाखवून द्यायचं आहे. पुढील काळात महत्त्वपूर्ण प्रकरणांवर मी सुनावणी सुरुच ठेवणार आहे असं मी देशाच्या नागरिकांना आश्वस्त करतो. तसेच आता प्रकरण खूप पुढे निघून गेलं आहे. मी ज्या पदावर बसलो आहे त्या पदाला न्याय देण्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावेन असं मुख्य सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान शनिवारी या मुद्द्यावर सुनावणी करण्यात आली. यामध्ये न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य यावरही चर्चा झाली. मुख्य सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली एका खंडपीठामध्ये याची सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी महाधिवक्ता तुषार मेहता यांनी रंजन गोगोई यांच्यावर केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपाबाबत अधिकाऱ्यांना सांगितले.
सुप्रीम कोर्टाचे महासचिव संजीव सुधाकर कलगावकर यांनी सांगितले की, महिलेकडून लावण्यात आलेले आरोप दुर्दैवी आणि निराधार असल्याचं स्पष्ट केलं. तर न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी न्यायव्यवस्थेवर लोकांचा असणारा विश्वास पाहता न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याला घेऊन चिंता व्यक्त केली. अशाप्रकारच्या आरोपांमुळे न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडेल असंही सांगितले.
त्यांनी मला कवेत घेतलं, सरन्यायाधीश गोगईंवर लैंगिक शोषणाचे आरोप