कोलकाता, दि. 17 -पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पराभव झाला म्हणून एका अपक्ष महिला उमेदवाराने आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. तृणमुल कॉंग्रेसच्या बंडखोर नेत्या सुप्रिया डे यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या 10 वर्षांपासून त्या कूपप्स कॅंप वॉर्डमधून नगरसेविका म्हणून निवडून येत होत्या. पण नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांचा अवघ्या 30 मतांनी पराभव झाला.
13 ऑगस्ट रोजी येथे मतदान झालं होतं, त्यानंतर काल मतमोजणी झाली. निकाल आल्यानंतर थोड्याचवेळात सुप्रिया यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या 35 गोळ्या खाऊन आत्महत्या केली.सुप्रिया यांच्या विरोधात उभ्या असलेल्या अशोक सरकार यांच्याकडून सुप्रिया यांचा पराभव झाला. अशोक सरकार हे तृणमुल कॉंग्रेसचे आहेत. अशोक सरकार यांना या निवडणुकीत 350 मतं मिळाली तर सुप्रिया डे यांना 320 मतं मिळाली.
बंगालमध्ये ममताच नंबर 1, पण भविष्यात भाजपाचे चॅलेंज-
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असला तरी, भाजपा मुख्य विरोधी पक्ष म्हणून समोर आला आहे. सर्वच्या सर्व सात महापालिकांमध्ये तृणमुलने काँग्रेसने विजय मिळवला आहे. भाजपा या निवडणुकीत दुस-या स्थानावर असून, डावे थेट तिस-या क्रमांकावर फेकले गेले आहेत. तीन महापालिकांमध्ये भाजपाने सहा जागा जिंकल्या आहेत.
उत्तर बंगालमधील धुपगुरी येथे चार, बुनियादपूर आणि पानस्कुरामध्ये प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. तृणमुलने बर्दवान जिल्ह्यातील दुर्गापूर महापालिकेत सर्वच्या सर्व 43 वॉर्डमध्ये विजय मिळवला. हलदीया महापालिकेत तृणमुलने सर्वच्या सर्व 29 जागा जिंकल्या. महापालिका क्षेत्रात भाजपाला मिळालेले यश हे आगामी काळात तृणमुलसमोर भाजपाचे आव्हान उभे राहणार असल्याचे संकेत आहेत असे निवडणूक विश्लेषकांनी सांगितले.
या निवडणुकीत काँग्रेसला एक जागाही जिंकता आली नाही. हल्दीया महापालिका डाव्यांचा गड होता. पण तृणमुलने इथे सर्वच्या सर्व 29 जागा जिंकल्या. धुपगुरीमध्ये तृणमुलने 12 तर, भाजपाने चार जागा जिंकल्या. या निवडणुकीत तृणमुलची मते कमी न होता उलटी वाढली आहेत. डाव्यांचा जो जनाधार होता तो भाजपाकडे झुकतोय हे या निवडणूकीतून दिसले असे तृणमुलचे नेते गौतम देब यांनी सांगितले. तृणमुलने ही निवडणूक जिंकण्यासाठी धन आणि मसल पावरचा उपयोग केला असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला.
निवडणुकीच्या या निकालातून भाजपाचा पश्चिम बंगालमध्ये जनाधार तयार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारच्या कट्टर विरोधक आहेत. त्यांनी अऩेक मुद्यांवर मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.