हैदराबाद: तेलंगणामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्वच पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार अगदी जोरात सुरू आहे. मतदारांवर आश्वासनांचा पाऊस पाडण्याचं काम उमेदवारांकडून केलं जात आहे. मात्र यातही एका अपक्ष उमेदवाराचा निवडणूक प्रचार सर्वात लक्षवेधी ठरत आहे. सर्व उमेदवार मतदारांच्या दारोदारी जाऊन हात जोडत असताना एक उमेदवार सर्व मतदारांच्या हाती चपला देत आहे. जिंकून आल्यावर काम केलं नाही, तर याच चपलांनी मारा, असं हा उमेदवार मतदारांना सांगत आहे. तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यातल्या कोरातला मतदारसंघातून अकुला हनुमंत विधानसभा निवडणूक लढवत आहेत. अकुला हनुमंत अपक्ष उमेदवार आहेत. मतदारांना दिलेली आश्वासनं आपण नक्की पूर्ण करणार असल्याचं हनुमंत सांगतात. 'मतदार मला नक्की मतं देतील, असा मला विश्वास आहे. निवडणूक आल्यावर मी सर्व आश्वासनं पूर्ण करेन. त्यासाठी मी घरोघरी जाऊन मतं मागत आहे. मी तुम्हाला दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करेन, असा विश्वास मी जनतेला देत आहे. दिलेला शब्द न पाळल्यास, मी दिलेल्या चपलेनंच मला मारा, असं मी मतदारांना सांगत आहे,' अशी माहिती त्यांनी दिली. सध्या अकुला हनुमंत मतदारसंघातल्या घराघरांमध्ये जात आहेत. मतदारांच्या हाती चप्पल देणाऱ्या हनुमंत यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी प्रचाराचा हा हटके व्हिडीओ शेअर केला आहे. तेलंगणा विधानसभेच्या ११९ जागांसाठी ७ डिसेंबरला मतदान होणार आहे. यानंतर ११ डिसेंबरला निकाल जाहीर होईल.