स्वतंत्र्य भारतात ही दुसरी निवडणूक ज्यात महागाईचा मुद्दा नाही - राजनाथ सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 09:27 AM2019-05-17T09:27:49+5:302019-05-17T09:28:25+5:30
आम्ही देशाच्या शत्रुंना कधीच सोडणार नाही. आमचे जवान पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करायला गेले होते. त्याठिकाणी पिकनिकला गेले नव्हते म्हणून काँग्रेस पुरावे मागते
मंडी - भारताच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर प्रत्येक निवडणुकीत महागाईचा मुद्दा असायचा. काँग्रेसच्या शासनकाळात महागाईचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत यायचा. मात्र 2004 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये महागाई हा मुद्दा आला नाही. कारण भाजपा सरकारचं आर्थिक धोरणाचं नियोजन अशारितीने केले होते त्यात महागाईवर नियंत्रण मिळवता आले असा दावा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथे प्रचारसभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, 2004 च्या आधी अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होतं तर 2019 च्या निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. त्यामुळे निवडणुकीत इतर मुद्दे आले पण महागाई मुद्दा आला नाही. भाजपा सरकारच्या काळात आर्थिक नियोजन केल्यामुळे महागाईवर नियंत्रण ठेवता आलं. त्याचसोबत भ्रष्टाचारावर प्रहार केल्यामुळे महागाई कमी झाली. पाकिस्तानात महागाई प्रचंड वाढली असताना भारतात महागाईवर नियंत्रण ठेवण्यात सरकारला यश आलं. त्यामुळे महागाईला पाकिस्तानातून भारतात येता आलं नाही असा दावा त्यांनी केला.
HM Rajnath Singh: There was Atal Bihari Vajpayee's govt before 2004&Narendra Modi's before 2019,both of them handled economic mgmt like that&attacked corruption. Pakistan's inflation rate is 10-12% & India's is 2-3%. We didn't let inflation cross Indo-Pak border&enter here.(16.5) https://t.co/2o1u4eehYs
— ANI (@ANI) May 16, 2019
जेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे तुकडे करुन बांग्लादेश बनवला होता त्यावर त्यांची जयजयकार झाली. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला जशास तसे सडेतोड उत्तर दिलं त्यांचा जयजयकार का करु नये. भारतीय जवानांचे कौतुक आम्ही प्रत्येक व्यासपीठावरुन करु. जवान देशासाठी सीमेवर तैनात असतात म्हणून आपण देशात सुरक्षित राहतो असंही राजनाथ सिंह यांनी सांगितले.
काँग्रेस सत्तेत आल्यानंतर देशद्रोहाचा कायदा नष्ट करणार सांगते मात्र आम्ही सत्तेत आलो तर देशद्रोहाच्या कायद्यातील त्रुटी दूर करुन हा कायदा आणखी सक्षम करु ज्यामुळे देशाच्या विरोधात काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला चाप बसेल. आम्ही देशाच्या शत्रुंना कधीच सोडणार नाही. आमचे जवान पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करायला गेले होते. त्याठिकाणी पिकनिकला गेले नव्हते म्हणून काँग्रेस पुरावे मागते असा टोला राजनाथ सिंह यांनी काँग्रेसला लगावला. तसेच भाजपामध्ये बुथवर काम करणारा कार्यकर्ता मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बनू शकतो कारण आमच्याकडे परिवारवाद नाही असंही त्यांनी सांगितले.