Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्न दिवसेंदिवस शिगेला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. या मुद्द्यावरून लोकसभेतही खडाजंगी झाली. यातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कन्नड रक्षण वेदिकेकडून धमकीचे फोन आल्याचा दावा केला आहे. यावर अपक्ष खासदार नवनवीत राणा यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून वारंवार परखड भूमिका मांडत असल्याने कन्नड रक्षण वेदिकेकडून धमकीचे फोन आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. बेळगाव सीमावासियांवर अन्याय होताना शिंदे सरकार काहीच ठोस भूमिका घेत नाही. हे सरकार षंढ, नामर्द असून, कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मला फोन केले. माझ्यावर हल्ला झाला तर तो माझ्यावर नसून महाराष्ट्रावर झालेला हल्ला असेल, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. तसेच शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी संजय राऊत यांना आता आवरा. नाही तर पुन्हा जेलमध्ये आराम करायला जावे लागले, असा इशारा दिला होता. शंभुराज देसाई यांच्या पत्रकार परिषदेनंतरच कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मला फोन केले, असाही दावा राऊत यांनी केला आहे.
नेहमी काही ना काही अजेंडा असतो
संसदेचे हिवाळी अधिवेशन दिल्लीत सुरू आहे. खासदार नवनीत राणा अधिवेशनाला उपस्थित आहेत. संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीबाबत बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, धमकी कुणाला येत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. लोकप्रतिनिधीला थेट करत असेल तर त्याची चौकशी अधिक गांभीर्याने घेतली पाहिजे. राऊत यांच्या वक्तव्यामागे नेहमी काही ना काही अजेंडा असतो. यावेळीही असेल. त्यामुळे या फोन कॉलची खरोखरच चौकशी झाली पाहिजे, असे नवनीत राणा म्हणाल्या.
दरम्यान, काही लोकं हे संपादक आहेत की केवळ पादक आहेत हे आता पाहावे लागेल. कारण सार्वजनिक ठिकाणी वायु प्रदुषणाचा कार्यक्रम म्हणजे संजय राऊत यांनी पत्रकार परिषद, या शब्दांत भाजप मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी बोचरी टीका केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"