ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - भाजपाने निवडणुकीत स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन कधीच दिले नव्हते असे सांगत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर यू टर्न घेतले आहे. तर अयोध्येतील राम मंदिर, जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणे अशा महत्त्वाच्या विषयांसाठी लोकसभेत भाजपाचे ३७० खासदार असणे गरजेचे आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीतील भाजपा कार्यालयात भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत स्वतंत्र विदर्भाबाबत प्रश्न विचारला असता आम्ही निवडणुकीत स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन कधीच दिले नव्हते असे सांगत अमित शहांनी या प्रश्नावर अधिक भाष्य करणे टाळले आहे. अमित शहांच्या या विधानाने राज्यातील भाजपा नेते विशेषत: नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांची कोंडी होण्याची चिन्हे आहेत. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरुन शिवसेना - भाजपामध्ये नेहमीच वाद झाला असून भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी उघडपणे स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
अयोध्येतील राम मंदिर, जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणे हे भाजपाचे महत्त्वाचे विषय असून त्यावर तोडगा काढण्यासाठी भाजपाची सध्याची भूमिका काय असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला होता. यावर अमित शहा म्हणाले, अशा विषयांवर तोडगा काढण्यासाठी लोकसभेत पक्षाचे ३७० खासदार निवडून येणे गरजेचे आहे. त्यामुळे भाजपाने निवडणुकीत दिलेले आश्वासन आता जुमला होती की काय असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहेत.