ऑनलाइन लोकमत
ओटावा, दि. २८ - १९८५च्या एअर इंडिया बाँबस्फोट प्रकरणात दोषी आढळलेला एकमेव आरोपी इंदरजीत सिंग रेयात २० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा बोगून झाल्यामुळे कॅनडाच्या तुरुंगातून मुक्त करण्यात आला आहे.
कॅनडाच्या सरकारी अधिका-यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एअरलाइनवर सर्वात भीषण हल्ला केल्याप्रकरणी तसेच सुटकेसमध्ये बाँब भरून ते व्हॅन्कोवरमधून सुटणा-या विमानात ठेवल्याप्रकरणी इंदरजीतला ९ व १५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा जाली होती. कॅनडाच्या कायद्याप्रमाणे त्यापैकी अत्यावश्यक शिक्षा भोगल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली आहे.
एअर इंडियाचे एक विमान आयर्लंडजवळ पोचताना बाँबच्या स्फोटामुळे उध्वस्त झाले ज्यामध्ये विमानातले ३२९ प्रवासी जागीच ठार झाले. तर दुसरे विमान जपानमध्ये बाँबस्फोटात उडाले, ज्यामध्ये माल वाहून नेणारे दोन हमाल ठार झाले.
खलिस्तानवाद्यांविरोधात भारताने केलेल्या कारवाईविरोधात बदला म्हणून हे हल्ले करण्यात आले होते.
इंदरजीतची पूर्ण शिक्षा ऑगस्ट २०१८मध्ये संपणार आहे, तोपर्यंत अनेक अटींसह त्याला तुरुंगात नाही, घरातच परंतु नजरकैदेत रहावे लागणार आहे.