नवी दिल्ली - देशभरात आज 75 व्या स्वातंत्र्य दिनाचा (Celebration 15th Auguest 2021) उत्साह पाहायला मिळत आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीसह देशभर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. भाषणाच्या सुरुवातील नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अन्य महापुरुषांना आदरांजली वाहिली आहे. देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा (Happy independence day 2021) दिल्या आहेत. "हे वर्ष नवीन ऊर्जा, चेतना घेऊन येईल" असं मोदींनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. आपणा सर्वांना 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे वर्ष देशवासियांमध्ये नवी ऊर्जा आणि नवीन चेतना घेऊन येईल. जय हिंद!" असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून देशाला पदके जिंकून देणाऱ्या खेळाडूंचा पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला आहे. तसेच स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत असताना फाळणीचे दु:ख देशवासियांच्या मनात ताजे आहे. त्यामुळे आमच्या सरकारने 14 ऑगस्ट हा विभाजन विभिषिका स्मृती दिवस म्हणून साजरा केला जाईल असं म्हटलं आहे.
"विकासाच्या मार्गावरून चालत असतानाच देशासमोर कोरोनाचे संकट आले. देशवासियांनी संयम आणि धैर्याने संकटाचा सामना केला आहे. कोरोनाविरोधाच्या लढाईत आम्ही सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत देशातील 54 कोटी हून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. येथून पुढच्या 25 वर्षांचा प्रवास भारताचा सृजनाचा अमृतकाळ आहे. या अमृतकाळामध्ये आपल्या संकल्पांची सिद्धी आम्हाला स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत घेऊन जाईल" असं देखील नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.