ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - वेतनमान आणि शैक्षणिक संधी यांच्यामध्ये असलेल्या लैंगिक समानतेच्या सूचीत भारताने 144 देशांमधून 87वे स्थान मिळवले आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ही सूची तयार केली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या नव्या सूचित भारताने गतवर्षीच्या तुलनेत 21 स्थानांनी प्रगती करत पहिल्या 100 देशांमध्ये स्थान मिळवले. मात्र लैगिक समानतेच्या दिशेने जाण्यासाठी भारताला अजून मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट - 2016 या नावाने हा अहवाल तयार केला आहे. भारताने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात असलेली लैंगिक तफावत पूर्णपणे संपुष्टात आणल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
लैंगिक समानतेच्या बाबतीत दक्षिण आशियाई देशांमध्ये बांगलादेशने बाजी मारली आहे. बांगलादेशने या सूचीत भारताला मागे टाकत 72 वे स्थान पटकावले आहे. जागतिक सूचीत 87 व्या स्थानी असलेल्या भारताला दक्षिण आशियाई देशांमध्ये दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. त्यापाठोपाठ श्रीलंका 100व्या, नेपाळ 110व्या, मालदीव 115व्या आणि भूतान 121 व्या स्थानी आहेत. तर 144 देशांच्या या सूचीत पाकिस्तान शेवटून दुसऱ्या स्थानी आहे. तर येमेन शेवटच्या स्थानी आहे.
या सूचीत आइसलँडने अव्वल स्थान पटकावले आहे. त्यापाठोपाठ फिनलंड, नॉर्वे आणि स्वीडन असा क्रम आहे. या सूचीत अमेरिका 45व्या स्थानी आहे. ब्रिक्स राष्ट्रापैंकी दक्षिण आफ्रिका 15व्या, रशिया 75व्या, ब्राझील 79 आणि चीन 99व्या स्थानी आहेत.