नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये इथेनॉलचे १० टक्क्यांपर्यंत मिश्रण करण्याचे लक्ष्य भारताने निर्धारित वेळेच्या पाच महिने आधीच साध्य केले आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत दिली.
सद्गुरू योगी वासुदेव यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘माती वाचवा’अभियानाअंतर्गत आज विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण संरक्षणासाठी व कार्बन उत्सर्जनाच्याविरोधात भारत करीत असलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पेट्रोलमध्ये १० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रण लक्ष्य केंद्र सरकारने ठरविले होते. ते निश्चित कालमर्यादेच्या ५ महिने अगोदरच गाठल्याचे माेदी म्हणाले.
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी भारत गेल्या आठ वर्षांपासून विविध पावले उचलत असल्याचे सांगून ते म्हणाले, मृदा आरोग्य कार्ड, नमामि गंगे, सेंद्रिय शेतीच्या प्रयोगातून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काम केले जात आहे. विकसित देश कार्बन उत्सर्जनात आघाडीवर असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. भारत २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन मुक्त देश होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्बन उत्सर्जनात मोठी घटइथेनॉलचे प्रमाण वाढविल्यामुळे कार्बन उत्सर्जनात २७ लाख टन एवढी घट झाली आहे. तसेच ४१ हजार कोटी रुपयांचे विदेशी चलन वाचले आहे. शेतकऱ्यांना ४० हजार कोटी रुपयांचे अधिक उत्पन्न होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
‘रासायनिक खतांचा वापर टाळणे धोक्याचे ठरेल...’
- शेतकऱ्यांनी रासायनिक खते व औषधींचा वापर टाळल्यास शेतीच्या उत्पादनावर परिणाम होईल. यामुळे समर्थ पर्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांना रासायनिक शेतीपासून दूर करु नये, असे स्पष्ट मत सद्गुरू वासुदेव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.- सद्गुरू वासुदेव म्हणाले, की रासायनिक खतांमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले, हे सत्य आहे. हरित क्रांतीमुळे शेतकऱ्यांचे प्रति एकर उत्पादन वाढले आहे, हे नाकारता येणार नाही. - रासायनिक खते व औषधींना पर्याय द्यावा लागेल किंवा शेतकऱ्यांना पुरेशी सबसिडी द्यावी लागेल, त्यानंतर रासायनिक खतांच्या वापरावर प्रतिबंध लावण्याचा विचार करता येईल, अन्यथा देशात अन्नधान्याचा तुटवडा पडेल, असा इशारा त्यांनी दिला.
भारतात तीव्रता अधिकभारत व जगातील इतर देशांमध्ये पर्यावरणाचे प्रश्नच जवळपास सारखेच असले तरी त्यांची तीव्रता भारतात अधिक आहे. भारताची लोकसंख्या जगाच्या १७ टक्के आहे; परंतु भूप्रदेश जगाच्या केवळ चार टक्के एवढाच आहे. लोकसंख्या व भूप्रदेशाच्या प्रमाणामुळे इतर देशांमध्ये समस्यांची तीव्रता निश्चितपणे कमी असल्याचे सद्गुरू वासुदेव यांनी सांगितले.