नवी दिल्ली, दि. 25 - भारताने चीनच्या हद्दीत घुसखोरी केल्याची कबुली दिली आहे असा दावा चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी केला आहे. सिक्कीमच्या सीमेवर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असताना आता गोंधळ निर्माण करण्यासाठी चीनकडून असे उलट-सुलट दावे केले जात आहेत. चूक काय, बरोबर काय ते सर्वांसमक्ष आहे. चिनी सैन्य भारताच्या हद्दीत घुसले नसून, अनेक भारतीय अधिका-यांनी जाहीरपणे ही बाब मान्य केली आहे असे वँग यांनी सांगितले.
वँग यांचे हे विधान चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाच्या वेबसाईटवर आहे. या वादावर तोडगा अत्यंत सोपा आहे. डोकलाममधून भारताने आपले सैन्य मागे घ्यावे असे वँग यांनी म्हटले आहे. ब्रिक्स देशांच्या परिषदेसाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे पुढच्या काही दिवसात चीनला जाणार आहेत. या भेटीच्या काही दिवस आधी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे विधान केले आहे. ब्राझील, चीन, भारत, रशिया आणि दक्षिण आफ्रिका हे पाच देश ब्रिक्समध्ये आहेत.
परिषेदच्या पार्श्वभूमीवर एनएसए अजित डोवाल आणि चीनच्या यांग जीईची यांच्यामध्ये व्दिपक्षीय चर्चेची शक्यता चीनने फेटाळून लावलेली नाही. सिक्कीमच्या सीमेवर भारत आणि चीनचे सैन्य मागच्या महिन्याभरापासून समोरासमोर उभे ठाकले आहे.
एकवेळ डोंगर हलवणं सोपं, पण आम्हाला नाही...चीनची भारताला धमकीचीन आतापर्यंत सरकारी मीडियाच्या माध्यमातून भारताला युद्दाची धमकी देत आला आहे, मात्र आता तर चीनने उघडपणे भारताला युद्धासाठी चेतावणी दिली आहे. एकवेळ डोंगर हलवणं सोपं आहे, मात्र चीन लष्कराला नाही, त्यामुळे भारताने डोकलाममधून मागे हटावं असा इशारा चीनने भारताला दिला आहे. भारताने माघार घेतली नाही तर डोकलाममधील आमच्या सैनिकांची संख्या वाढवू असं चीन लष्कराचे प्रवक्ते बोलले आहेत.
चीन लष्कराचे प्रवक्ते वू कियाने यांनी भारताला धमकी देताना सांगितलं आहे की, "चीन लष्कराचा 90 वर्षांचा इतिहास आमची ताकद आणि किती सक्षम आहोत हे दर्शवतं. एकवेळ डोंगर हलवणं सोपं आहे, मात्र लष्कराला नाही". पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, "भारताने कोणत्याही भ्रमात राहू नये. आमच्या मातृभूमीचं संरक्षण करण्यासाठी कोणतीही किंमत चुकवू".