मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि तालिबानच्या नियंत्रणाखाली असलेल्या अफगाणिस्तानच्या सीमेवर कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. तसेच दोन्हीकडून एकमेकांवर हल्ले होत आहेत. या पार्श्वभूमीवर तालिबानकडूनभारत सरकारला महत्त्वाचं आश्वासन देण्यात आलं आहे. ‘’आमच्या जमिनीवरून भारतविरोधी कारवाया होणार नाहीत”, असं आश्वासन तालिबाननं भारताला दिलं आले. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मौलवी आमिर मुत्ताकी यांच्यामध्ये दुबईत झालेल्या भेटीवेळी तालिबानकडून हे आश्वासन देण्यात आले.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हे सध्या दुबईच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मौलवी आमिर मुत्ताकी यांची भेट घेऊन चर्चा केली. २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार स्थापन झाल्यानंतर भारत आणि अफगाणिस्तान सरकारमधील ही पहिलीच उच्चस्तरीय द्विपक्षीय भेट ठरली आहे. या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंधांसह क्षेत्रिय विकास आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यामध्ये इराणमधील चाबहार बंदराचा वापक आणि क्रिकेट या मुद्द्यांचाही समावेश होता. तसेच पाकिस्तानमधील अफगाण निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी मदत करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
भारताच्या परराष्ट् मंत्रालयाने सांगितले की, अफगाण सरकारने भारताच्या सुरक्षेबाबतच्या चिंता विचारात घेतल्या. अफगाणिस्तानच्या भूमीवरून भारतविरोधी दहशतवादी कारवायांना खतपाणी मिळू नये, अशी भारताची इच्छा आहे. त्याबाबत महत्त्वाचं आश्वासन देताना तालिबानने अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारताविरोधातील कारवायांसाठी होऊ दिला जाणार नाही, असे सांगितले.
या भेटीदरम्यान, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी भारत आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांमध्ये असलेल्या ऐतिहासिक मैत्रीवर भर दिला. दोन्ही पक्षांनी भारत सरकारकडून सुरू असलेल्या मानवतावादी मदत कार्यक्रमाचं मूल्यांकन केलं. तसेच अफगाणिस्तानच्या मंत्र्यांनी त्यासाठी भारताचं कौतुकही केलं.