बंगालमध्ये 'इंडिया' आघाडी संकटात! ममत बॅनर्जी म्हणाल्या, 'मी युतीची नावे सांगितली, पण बैठकीत...'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 07:42 PM2024-01-22T19:42:25+5:302024-01-22T19:44:04+5:30
देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.
देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. इंडिया आघाडीत जागावाटपावर चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी २२ जानेवारीला आघाडीत समाविष्ट असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर निशाणा साधला आणि मी त्यांच्याविरोधात ३४ वर्षे लढत असल्याचे सांगितले.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी पश्चिम बंगालमध्ये ३४ वर्षे डाव्यांच्या विरोधात लढले, पण आता मला ते 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत अटी घालण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ज्यांच्या विरोधात मी ३४ वर्षे लढले त्यांच्याशी मी सहमत नाही.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी युतीचे नाव ‘इंडियन नॅशनल डेमोक्रेटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स’ सुचवले होते, पण जेव्हा मी बैठकीला गेले तेव्हा मला दिसले की डावे पक्ष त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेत असल्याने मी भाजपशी लढत आहे, पण काही लोकांना जागावाटपावरून आमचे ऐकायचे नाही, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला.
टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी काही दिवसापूर्वी जागावाटपावरुन प्रतिक्रीया दिली होती. 'बंगालमधील लोकसभेच्या ४२ जागांपैकी पक्षाने काँग्रेसला दोन जागा देऊ केल्या आहेत. या कारणास्तव आम्ही काँग्रेसच्या राष्ट्रीय आघाडी समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही.
ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी १९ जानेवारी रोजी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत सांगितले की, विरोधी आघाडी 'इंडिया'मध्ये पक्षाला योग्य महत्त्व न दिल्यास टीएमसी लोकसभेच्या सर्व ४२ जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, यामुळे आता इंडिया आघाडीत जागावाटपावरुन वाद सुरू असल्याचे बोलले जात आहे.