लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, ठाकरे गटाकडून भाजपावर आक्रमकपणे टीका केली जात आहे. त्यात उद्धवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे भाजपाला सातत्याने लक्ष्य करत आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध होत असलेल्या ओपिनियन पोलच्या अंदाजावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. ओपिनियन पोलमधून काहीही दावे केले जात असले तरी इंडिया आघाडी देशात ३०५ जागा जिंकेल आणि राज्यात महाविकास आघाडी ३५ हून अधिक जागा जिंकेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम्ही पक्ष पाहतच नाही महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पाहत आहोत. आता रामटेकला आमचा उमेदवार नाही, मात्र तिथे आम्ही कामाला लागलो आहोत. त्यासाठी बैठक बोलावली आहे. प्रचारामध्ये हळुहळू रंग चढत जाईल.
ओपिनियन पोलमध्ये जे काही दाखवलं आहे, त्याच्याशी आम्ही सहमत नाही आहोत. महाराष्ट्रामध्ये आम्ही १०० टक्के यश मिळवण्याच्या मार्गावर आहोत. देवेंद्र फडणवीस हे ४५+ वगैरे म्हणताहेत. त्यांना आकडे लावायची सवय आहे, निवडणुकीनंतर त्यांना त्याच धंद्यात पडावं लागेल. पण महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी विजयी होईल. देशभरात आम्ही साधारण ३०५ जागा जिंकू. मोदी चारशे पार म्हणताहेत, पण आम्ही तसं म्हणणार नाही. आमचा अंदाज ३०५ जागा जिंकण्याचा आहे. तर महाराष्ट्रामध्ये आम्ही साधारण ३५+ जागा जिंकू, असा दावा संजय राऊत यांनी केला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही संजय राऊत यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री रामटेकमध्ये विद्यमान खासदाराला उमेदवारी देऊ शकले नाहीत. त्यांना उमेदवार बदलावा लागला. आता त्यांनी रोड शो करू द्या नाहीतर आणखी काही करू द्या, विदर्भात त्यांच्या हाती काहीही पडणार नाही.
तसेच रामनवमीच्या मुहूर्तावर राम मंदिरावरूनही संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली. ते म्हणाले की, भाजपाचं रामावरील जे प्रेम आहे ते नकली आणि राजकीय ढोंगाचं प्रेम आहे. कोणत्याही लढ्यामध्ये ते नव्हते. कोणत्याही संघर्षात ते नव्हते. तसेच जे भाजपासोबत गेले आहेत तेही नव्हते. प्रभू राम त्यांच्या मागे उभा राहणार नाही. जे आत्मविश्वासानं मैदानात लढतात, त्यांनाच राम पावतो, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.