देशात पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. देशातील ३५ हून अधिक विरोधी पक्षांनी एकत्र येत 'इंडिया आघाडी' केली आहे. या आघाडीच्या आतापर्यंत तीन बैठकाही झाल्या आहेत, पण, अजुनही पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. आता इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता एका नेत्याचे नााव समोर येत आहे.
'यूपीए सरकार आल्यानंतर लगेच महिला आरक्षण विधेयक लागू करणार : राहुल गांधी
या संदर्भात आता जेडीयुच्या एका मोठ्या नेत्याने नितीश कुमार यांना I.N.D.I.A. आघाडीकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याची मागणी केली आहे. बिहार विधानसभेचे उपसभापती महेश्वर हजारी यांनी यावर मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, 'मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे पंतप्रधानपदासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत. इंडिया आघाडी जेव्हा जेव्हा पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करेल तेव्हा त्यात नितीश कुमार यांचेच नाव असेल.
हजारी म्हणाले की, भारतात पंतप्रधानपदासाठी त्यांच्यापेक्षा योग्य कोणीही नाही. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत जेडीयूच्या सर्व सेल अध्यक्षांच्या बैठकीनंतर त्यांनी हे वक्तव्य केले. 'नितीश कुमार हे या देशातील सर्वात मोठे समाजवादी नेते आहेत, राम मनोहर लोहिया आणि जेपी यांच्यानंतर नितीश कुमार हे सर्वात मोठे समाजवादी नेते आहेत, असे पंतप्रधान मोदींनी स्वतः सांगितले आहे, असंही हजारी म्हणाले.
हजारी म्हणाले की, नितीशकुमार यांनी संपूर्ण विरोधकांना एकत्र केले आहे, त्यामुळे आज नाही तर उद्या त्यांची उमेदवारी इंडिया आघाडीतर्फे जाहीर केली जाईल.
यापूर्वी जेडीयू अध्यक्ष लालन सिंह यांनीही ही मागणी केली होती. ते एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते की, लोकांना नितीश कुमार यांना देशाचे नेतृत्व पाहायचे आहे. यावेळी जेडीयू सरकारमधील प्रमुख मंत्री लेसी सिंह यांनीही नितीश कुमार यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे म्हटले होते. बिहार सरकारचे मंत्री जेडीयू नेते जामा खान म्हणाले होते की, देशातील जनतेला नितीश यांना पंतप्रधान म्हणून पाहायचे आहे.
यामुळे आता नितीश कुमार यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू आहे. पंतप्रधान उमेदवारीवरुन अजुनही इंडिया आघाडीतील कोणत्याही नेत्याने प्रतिक्रीया दिलेली नाही.