नवी दिल्ली - भारतीय लष्कराची ताकद आता आणखी वाढली आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलेस्टिक मिसाइल अग्नी-5 क्षेपणास्त्राचे बुधवारी यशस्वी परीक्षण करण्यात आले. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. या क्षेपणास्त्राची रेंज 5000 किमी असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी 7.50 वाजता हे क्षेपणास्त्र लॉन्च करण्यात आले. याच वेळी, सरकारने पुन्हा स्पष्ट केले, की कोणत्याही शस्त्राचा पहिल्यांदा वापर केला जाणार नाही, हे भारताचे धोरण कायम राहील. अशात भारत केवळ आपली शक्ती वाढविण्यावर पूर्ण भर देईल. अग्नी 5 च्या यशस्वी परीक्षणामुळे भारताची लष्करी ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चीनपासून ते पाकिस्तानपर्यंत सर्वजण अस्वस्थ आहेत. एवढेच नाही, तर या क्षेपणास्त्राच्या खऱ्या रेंजबाबतही या दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे.
ही आहे अग्नी-5 ची खासियत -अग्नी-5 संदर्भात सांगण्यात आले आहे, की अग्नी-5 ची मारक क्षमता 5000 किमी असणार आहे. एवढेच नाही, तर त्याच्या इंजिनवर मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आल्याने, त्याची ताकदही मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे मानले जात आहे. अग्नी-5 चे इंजिन थ्री-स्टेज सॉलिड इंधनापासून बनविण्यात आल्याचे सांगण्यात येते. यामुळे त्याची क्षमता आणि अचूकता ही, इतर क्षेपणास्त्रांपेक्षा अधिक असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अग्नी-5 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे (अग्नी-व्ही ICBM) वजन 50 हजार किलो आहे. ते 17.5 मीटर लांब आहे. त्याचा व्यास 2 मीटर म्हणजेच 6.7 फूट आहे. याच्या वर 1500 किलो वजनाचे अण्वस्त्र बसवले जाऊ शकते. या क्षेपणास्त्रामध्ये तीन-स्टेज रॉकेट बूस्टर आहे जे घन इंधनावर उडते. याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 24 पट जास्त आहे. म्हणजेच हे एका सेकंदात 8.16 किलोमीटरचे अंतर कापते.
अनेक टारगेट्स उद्धवस्त करण्याची क्षमता - या सर्वांशिवाय, अग्नी-5 चे MIRV तंत्रज्ञानदेखील विशेष आहे. यामुळे, त्याच्या वॉरहेडवर अनेक शस्त्रे बसवता येतात. अशा परिस्थितीत हे क्षेपणास्त्र एकावेळी अनेक लक्ष्य भेदू शकते. या क्षेपणास्त्राद्वारे संपूर्ण आशिया, युरोप, आफ्रिकेच्या काही भागांवर हल्ला केला जाऊ शकतो, असा दावा केला जात आहे.