नवी दिल्ली: भारतीय हवाई दलानं नियंत्रण रेषा ओलांडत जैश ए मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले. पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलानं ही धाडसी कारवाई केली. भारताच्या 20 मिराज 2000 विमानांनी जैशच्या तळांवर 1000 किलोंचे बॉम्ब फेकले. यामध्ये जवळपास 300 दहशतवादी मारले गेले. विशेष म्हणजे मध्यरात्री तीन ते साडेतीन दरम्यान अवघ्या 21 मिनिटांमध्ये भारतीय वैमानिकांनी मोहीम फत्ते केली. काल मध्यरात्री भारतीय हवाई दलानं बालकोट, मुझफ्फराबाद आणि चकोटीतील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मिट्ट अंधारात हवाई दलाच्या वैमानिकांनी लक्ष्याचा अचूक वेध घेतला. गुप्तचर विभागाच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली. याबद्दलची माहिती अवघ्या सात जणांकडे होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्कर प्रमुख बिपिन रावत, हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ, नौदल प्रमुख सुनील लांबा यांच्यासह गुप्तचर विभाग आणि रॉचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. हवाई दलाची कारवाई सुरू असताना आणि त्यानंतर सतर्क राहण्याचा इशारा सर्व दलांना देण्यात आला होता.हवाई दलाची कामगिरी यशस्वी झाल्याची माहिती अजित डोवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची बैठकीत दिली. कॅबिनेटच्या सुरक्षा समितीच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, अर्थ मंत्री अरुण जेटली यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. हवाई दलाच्या धडाकेबाज कारवाईत जैशचे 25 टॉप कमांडर मारले गेल्याचं डोवाल यांनी समिती सदस्यांना सांगितलं. 'भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राइकमध्ये जैशचे बहुतांश टॉप कमांडर मारले गेले. त्यामुळे या हल्ल्यात जैशचं मोठं नुकसान झालं,' अशी माहिती त्यांनी दिली.पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी तळांवर मोठ्या संख्येनं भरती सुरू होती, असं डोवाल म्हणाले. 'भारताच्या हल्ल्यात जैशचे दहशतवादी, प्रशिक्षक, टॉप कमांडर आणि जिहादी मारले गेले. या ठिकाणी आत्मघाती हल्ले घडवण्याच्या तयारीत असलेल्या 42 जणांना प्रशिक्षण देण्यात येत होतं. याबद्दलची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली. यानंतर या भागातील सूत्रांच्या मदतीनं अधिकची माहिती मिळवल्यानंतर हवाई दलानं गुप्तचर विभागाच्या मदतीनं दहशतवादी तळांवर जोरदार हल्ले चढवले,' अशी माहिती डोवाल यांनी दिली. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारवर देशभरातून प्रचंड दबाव होता. पाकिस्तानला धडा शिकवा, अशी मागणी जोर धरत होती. दोन वर्षांपूर्वीच भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता. उरीतील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईची कल्पना असल्यामुळे पुलवामातील हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या यंत्रणा सतर्क होत्या. नियंत्रण रेषेजवळील दहशतवाद्यांचे तळदेखील हलवण्यात आले होते. त्यामुळे लष्करी कारवाई जिकरीची होती. म्हणूनच हवाई दलानं दहशतवादी तळांवर बॉम्ब हल्ले केले.
India Air Strike on Pakistan: फक्त 'या' सात व्यक्तींना होती एअर स्ट्राइकची कल्पना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 5:59 PM