I.N.D.I.A. Alliance: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या INDIA आघाडीच्या बैठकीची तारीक अखेर ठरली आहे. कांग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीची चौथी बैठक मंगळवारी (19 डिसेंबर) राजधानी दिल्लीत होणार आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या पराभवानंतर ही पहिलीच बैठक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये 19 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. यापूर्वीची बैठक मुंबईमध्ये झाली होती. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भाजपने तीन राज्यात सत्ता मिळवली, तर काँग्रेसने एक राज्य काबीज केले. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची असणार आहे.
मीटिंगमध्ये सीट शेअरिंग आणि टॉप अजेंडा ठरू शकतोआगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची रणनीती आणि जागावाटवाबाबत चर्चा होऊ शकते. आघाडीतील अनेक पक्ष जागावाटपाबाबत लवकर निर्णय घेण्यासाठी दबाव आणत आहेत. आघाडीत काँग्रेसला बिग ब्रदरची भूमिका बजावायची आहे, मात्र निवडणुकीत पराभवानंतर पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अशा स्थितीत आघाडीत काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे. आता यात नेमका कसा फॉर्म्युला ठरणार, हे पाहणे महत्वाचे असेल.