- आदेश रावलनवी दिल्ली - रोज संध्याकाळी पाच वाजल्यापासून कोणत्या ना कोणत्या चॅनलवर द्वेषाची दुकाने सजली जातात. आम्ही या द्वेषाच्या बाजाराचे ग्राहक बनणार नाही, असे म्हणत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने गुरुवारी माध्यमांशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेतला. मंगळवारी समन्वय समितीने म्हटले होते की, गुरुवारी मीडिया कमिटीची बैठक होईल. आज या कमिटीने राष्ट्रीय न्यूज चॅनलशी संबंधित १४ अँकरवर बहिष्कार घातला.
विरोधकांच्या २६ पक्षांचे प्रवक्ते या अँकरच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नाहीत. एक समिती गठित करण्यात आली होती. तिने या अँकरच्या जुन्या कार्यक्रमांबाबत एक अहवाल तयार केला होता. समन्वय समितीच्या बैठकीत यावर चर्चाही झाली होती. काँग्रेसने आधीपासूनच रिपब्लिक व टाइम्स नाऊ चॅनलवर प्रतिबंध घातला आहे. यापुढे निर्णय घ्यावा लागला तर ११ राज्यांत जिथे विरोधकांचे सरकार आहे तिथे या सर्व चॅनलच्या जाहिरातींवर रोख लावण्यावरही विचार सुरू आहे.
ते नेमके कोण?टीव्ही १८चे अमन चोपडा, अमिश देवगन, आनंद नरसिंहन, इंडिया टीव्ही- प्राची पाराशर, भारत समाचार-रूबिका लियाकत, आज तक-चित्रा त्रिपाठी, सुधीर चौधरी, गौरव सावंत, शिव अरूर, टाइम्स नाऊ-नाविका कुमार, सुशांत सिंह, भारत एक्स्प्रेस-आदिती त्यागी, दूरदर्शन-अशोक श्रीवास्तव व रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णव गोस्वामी.