बंगालमध्ये आघाडी तोडली, विरोधात लढल्या; ममता वायनाडमध्ये प्रियांका गांधींसाठी प्रचार करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 07:23 PM2024-06-21T19:23:35+5:302024-06-21T19:24:00+5:30

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी आणि तृणमूलच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात गरळ ओकली होती. निवडणुकीनंतरही काही फारसे दोन्ही पक्षांत आलबेल नाही.

India Alliance broke in west Bengal, fought against; Mamta banerjee likely to campaign for Priyanka Gandhi in Wayanad | बंगालमध्ये आघाडी तोडली, विरोधात लढल्या; ममता वायनाडमध्ये प्रियांका गांधींसाठी प्रचार करण्याची शक्यता

बंगालमध्ये आघाडी तोडली, विरोधात लढल्या; ममता वायनाडमध्ये प्रियांका गांधींसाठी प्रचार करण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींविरोधात एकवटलेले विरोधक जेव्हा जागा वाटपाची वेळ आली तेव्हा सोंगट्यांसारखे विखुरले होते. यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पहिल्या होत्या. ममतांनी प. बंगालमध्ये एकट्याने लढण्याची घोषणा केली होती. काँग्रेसविरोधात उमेदवार देत निवडणूक लढविली होती. आता याच ममता बॅनर्जी वायनाडमध्ये प्रियांका गांधींसाठी प्रचाराला जाणार असल्याचे वृत्त आहे. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी आणि तृणमूलच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात गरळ ओकली होती. निवडणुकीनंतरही काही फारसे दोन्ही पक्षांत आलबेल नाही. ममतांनी काँग्रेसच्या खासदारालाही पाडले. आजही पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे नेते ममतांवर तोंडसुख घेत आहेत. अशातच ममता गांधींच्या प्रचाराला वायनाडला जाणार असल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

काही दिवसांपूर्वी ममता यांनी भाजपाच्या खासदाराची भेट घेतली होती. तेव्हा ममता एनडीएसोबत जाऊन खेळ करतात की काय अशी देखील चर्चा होती. यानंतर वायनाडमध्ये प्रियंका गांधींची उमेदवारी जाहीर होताच माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी ममतांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी ममतांनी वायनाडमध्ये काँग्रेसचा प्रचार करावा, अशी विनंती केल्याचे सुत्रांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. 

दोन पक्षांमध्ये जो दुरावा निर्माण झाला आहे तो मिटविण्यासाठी चिदंबरम यांनी ममतांची भेट घेतल्याचेही सांगितले जात आहे. अधीर रंजन चौधरी यांनी विखारी टीका केल्याने टीएमसी काँग्रेसपासून दुखावली गेली होती. या निवडणुकीत चौधरी यांचा पराभव झाला आहे. आता झाले गेले विसरून ममतांना पुन्हा सोबत आणण्यासाठी काँग्रेसचे नेते प्रयत्न करत आहेत. 

केरळमध्ये राहुल गांधी हे दुसऱ्यांदा निवडून आले होते. परंतू, राहुल यांनी रायबरेलीची जागा ठेवल्याने वायनाडमध्ये पुन्हा पोटनिवडणूक होणार आहे. या जागी काँग्रेस प्रियांका गांधी यांना लढविणार आहे. या पोटनिवडणुकीतून डाव्यांचा गड असलेल्या केरळात २०२६ च्या विधानसभा निवडणुकाही साधण्याचा काँग्रेसचा डाव आहे. 

Web Title: India Alliance broke in west Bengal, fought against; Mamta banerjee likely to campaign for Priyanka Gandhi in Wayanad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.