I.N.D.I.A Coordination Committee Meet: अलीकडेच विरोधकांच्या INDIA आघाडीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा पहिली बैठक आज (13 सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाली. यावेळी डी राजा, केसी वेणुगोपाल, तेजस्वी यादव, संजय राऊत, राघव चढ्ढा, मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्लांसह अनेक नेते बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला.
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळमध्ये विरोधकांची संयुक्त रॅली काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच, जागावाटपाचा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व पक्ष चर्चा करुन लवकरात लवकर निर्णय घेतील, अशी माहिती त्यांनी दिली.
वेणुगोपाल पुढे म्हणाले की, भोपाळमधील पहिल्या रॅलीत देशातील महागाई, बेरोजगारी आणि भाजपच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर भाष्य केले जाईल. तसेच, काही मीडिया ग्रुपच्या शोमध्ये इंडिया आघाडीतील कोणताही नेता सामील होणार नाही, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. समन्वय समितीच्या बैठकीनंतर आपचे खासदार राघव चढ्ढा म्हणाले की, सर्व पक्ष जागावाटपाबाबत लवकरात लवकर निर्णय घेतील. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, ज्या जागा इंडिया आघाडीतील पक्षांकडे आहेत, त्या जागांवर चर्चा होणार नाही. आम्ही भाजप, एनडीएकडे असलेल्या जागांबाबत चर्चा करू.