देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची सर्वपक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी सुरू केली असून आता जागावाटपाची चर्चा सुरू आहे. भाजपनेही ४०० पारचा नारा देत लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे, इंडिया आघाडीमध्ये जागावाटपावरुन वाद सुरू असल्याचे बोलले जात आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एकला चलो रेच्या धर्तीवर तयारीत व्यस्त आहेत, तर बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चा सुरू आहेत.
तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी शनिवारी काँग्रेसवर आरोप केले. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्षासोबत जागावाटपाची चर्चा करायची असेल तर जुन्या पक्षाला राज्यातील 'ग्राउंड रिअॅलिटी' स्वीकारावी लागेल. राज्यात भाजपला पाय रोवण्यास काँग्रेस मदत करत असल्याचा आरोपही घोष यांनी केला. काँग्रेसची राज्य युनिट भाजपला ऑक्सिजन देऊन आणि त्यांना येथे मजबूत पाय रोवून मदत करत आहे. हे चालणार नाही. आम्ही तयार आहोत. येथील सर्व ४२ लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढवणार. काँग्रेसला राज्यातील ग्राऊंडच्या वास्तवाच्या आधारे जागावाटपावर सहमती द्यावी लागेल. मात्र, त्याऐवजी ते दबावाचे राजकारण करत आहेत, असंही घोष म्हणाले.
बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीच्या स्थापनेत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, तर दुसरीकडे भाजप आणि जेडीयूमधील जवळीक पुन्हा एकदा वाढू लागली आहे. अमित शहा यांनी आधीच याचे संकेत दिले आहेत, बिहारमधील एनडीए मित्र पक्षाचे नेते नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये सामील होणार असल्याचा दावा करत आहेत, यामुळे इंडिया आघाडीत निवडणुकी अगोदर बिघाडी सुरू असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.