नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीला ८ महिने झाले नाही तोवर देशात भाजपा विरोधी पक्षांनी बनवलेली INDIA आघाडी संपुष्टात आली का असा प्रश्न काँग्रेस नेत्याच्या विधानानं निर्माण झाला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येत देशात इंडिया आघाडी बनवली. मात्र आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यानंतर आता काँग्रेस नेते पवन खेडा यांनी ही आघाडी केवळ लोकसभेपुरती होती असं विधान केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंडिया आघाडीबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवन खेडा म्हणाले की, ही आघाडी लोकसभेपुरती होती. इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी होती जी राष्ट्रीय स्तरावर होती. आपल्याला एकत्र लढले पाहिजे की नाही याचा निर्णय विविध राज्यात तिथल्या परिस्थितीनुसार जे पक्ष आहेत मग काँग्रेस असो वा प्रादेशिक पक्ष घेत असतात असं त्यांनी सांगितले.
तेजस्वी यादव काय म्हणाले होते?
'इंडिया आघाडी बनवत असताना असं ठरलं होतं की, ही आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीपुरती असेल. विधानसभा निवडणुकीत ही आघाडी असणार नाही असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं होते. गेल्या काही महिन्यात इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडूनच काँग्रेसबद्दल नाराजीचे सूर उमटत आहेत. त्यात आता तेजस्वी यादवांनी विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याबद्दल सूचक विधान केले होते.
"इंडिया आघाडी विसर्जित करा"
दरम्यान, दिल्ली निवडणुकीपूर्वी आप आणि काँग्रेसमधील जोरदार वादावर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी भाष्य केले. विरोधी पक्ष एकजूट नाही, त्यामुळे इंडिया आघाडी विसर्जित करायला हवी. इंडिया आघाडीची बैठक झाली नाही हे दुर्दैवी आहे. कोण नेतृत्व करेल? अजेंडा काय असेल? युती कशी पुढे जाईल? या मुद्द्यांवर कोणतीही चर्चा झालेली नाही. तिथे या विषयावर कोणतीही स्पष्टता नाही. आपण एकजूट राहू की नाही हा प्रश्न आहे. जर ती आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीसाठी असेल तर आता ती संपवली पाहिजे, परंतु जर ती विधानसभा निवडणुकीसाठी चालू ठेवायची असेल तर मग आपल्याला एकत्र काम करावे लागेल असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं.