'इंडिया'त वाद कायम! अखिलेश यादव यांचं भाजपाच्या इशाऱ्यावर काम; कॉंग्रेसची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 05:36 PM2023-10-20T17:36:46+5:302023-10-20T17:37:21+5:30
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेसमध्ये वाद रंगला आहे.
Lok Sabha Elections 2024 : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेसमध्ये वाद रंगला आहे. मध्य प्रदेशात कॉंग्रेसने आश्वासन दिल्याप्रमाणे सहा जागा सोडल्या नसल्याची टीका अखिलेश यादव यांनी केली. याशिवाय अखिलेश यांनी उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांचा उल्लेख' चिरकुट नेता असा केला. अजय राय यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना कॉंग्रेसचे प्रवक्ते सीपी राय यांनी अखिलेश यांना लक्ष्य केले आणि त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असे म्हटले.
अखिलेश यांच्यावर टीका करताना सीपी राय म्हणाले, "समाजवादी पार्टी केंद्रातील सत्ताधाऱ्यांमुळे दबावाखाली आहे आणि भाजपाला सत्ता जाण्याची भीती सतावत आहे. त्यामुळेच कॉंग्रेसला हरवण्यासाठी त्यांनी बसपा, ओवैसी आणि आता समाजवादी पार्टीची देखील मदत घेत आहेत. असे असताना देखील पाचही राज्यात भाजपाची स्थिती वाईट आहे आणि कॉंग्रेसचे सरकार स्थापन होण्याची चिन्हे आहेत."
"अखिलेश यादव मुख्यमंत्री राहिले असून पक्षाचे अध्यक्ष आहेत तसेच सुक्षिशितही आहेत. ते एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे किमान त्यांच्याकडून अशी भाषा अपेक्षित नव्हती. त्यांची भाषा त्यांच्यामधील अस्वस्थता दाखवत आहे. राजकारणात ते खूप जुने आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून संयमाची अपेक्षा आहे", असेही सीपी राय यांनी सांगितले.
अखिलेश यादव जी मुख्य्मंत्री रहे है और पार्टी के अध्यक्ष है तथा शिक्षित भी है । उनसे एक राष्ट्रीय पार्टी के अध्यक्ष के लिए सड़क छाप भाषा की उम्मीद बिलकुल नहीं की जा सकती है । उनकी ये भाषा बौखलाहट का परिणाम है । उनके पास राजनीति के लिए बहुत उम्र है इसलिए उनसे संयम की उम्मीद की जाती…
— Dr C P Rai (@cprai) October 20, 2023
'इंडिया'त वाद
दरम्यान, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीत जागा न मिळाल्याने सपा आणि काँग्रेसमधील विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. अजय राय म्हणाले की, उत्तर प्रदेशात आम्ही कोणाच्या भरवश्यावर नसून कॉंग्रेस सर्व ८० जागांवर निवडणूक लढवत आहे. याला प्रत्युत्तर देताना अखिलेश यादव म्हणाले, "इंडिया' आघाडीबद्दल बोलण्याची त्यांची कुवत आहे का? मी कॉंग्रेस पक्षाला सांगू शकतो की, 'चिरकुट' नेत्यांना आवर घाला आणि आमच्या पक्षाबद्दल बोलणे टाळायला सांगा."