लवकरच होणार INDIA आघाडीची बैठक; जागा वाटपासह या मुद्द्यांवर होणार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 02:33 PM2023-12-10T14:33:35+5:302023-12-10T14:34:05+5:30
INDIA Alliance Meeting: लोकसभा निवडणुकीला अवघे काहीच महिने शिल्लक आहेत, त्यामुळे ही बैठक महत्वाची मानली जात आहे.
INDIA Alliance: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्या, आता सर्व पक्षांचे लक्ष आगामी लोकसभा निवडणुकांवर लागले आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या 7 ते 8 दिवसांत विरोधी पक्ष्यांच्या INDIA आघाडीची बैठक होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बैठकीत किमान समान कार्यक्रम आणि जागावाटपावर चर्चा होणार आहे. या बैठकीत विरोधक सामायिक अजेंडाही ठरवणार असल्याची माहिती आहे.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात सार्वत्रिक निवडणुकांची तारीख जाहीर होऊ शकते. त्यामुळे तयारीसाठी काहीच महिने शिल्लक आहेत. अशात सत्ताधारी एनडीएचा पराभव करण्यासाठी एकवटलेल्या विरोधकांना लवकरात लवकर सामियिक अजेंडा आणि जागावाटवाचा निर्णय घ्यावा लागेल. विरोधकांनी आतापासून तयारी सुरू केली, तर तरच ते लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देई शकतील.
पराभवानंतर काँग्रेसमध्ये मंथन
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने बाजी मारली, तर तेलंगणात काँग्रेसचे सरकार आले. आश्चर्याची बाब म्हणजे राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता होती. अशा स्थितीत निदान छत्तीसगडमध्ये तरी पक्ष आपले सरकार वाचवेल, अशी आशा होती. मध्य प्रदेशातही काँग्रेसचे पुनरागमन निश्चित मानले जात होते.
मात्र, निवडणुकीचे निकाल समोर आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हिंदी हार्टलँडच्या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे आता इंडिया आघाडीच्या बैठकीत काँग्रेसला जास्त जागांवर दावा करता येणार नसल्याचेही बोलले जात आहे. काही राज्यांमध्ये इतर पक्षांना जास्त जागा द्याव्या लागतील.