I.N.D.I.A Rally In Delhi Ramlila Maidan: दिल्ली मद्य धोरणातील कथित मनी लाँड्रिंकप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ED ने अटक केली आहे. दरम्यान, आज दिल्लीतील रामलीला मैदानावर INDIA आघाडीच्या मेगा रॅलीमध्ये केजरीवालांच्या अटकेवरुन विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच, यावेली अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी मंचावरुन अरविंद केजरीवाल यांचे पत्र वाचून दाखवले.
दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या सभेतून सुनीता केजरीवाल यांनीही भाषण केले. यावेळी त्यांनी ED च्या ताब्यात असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पत्र वाचून दाखवले. सुनीता केजरीवाल म्हणाल्या, अरविंद केजरीवाल 'शेर' आहेत. त्यांनी तुरुंगातून जनतेसाठी खास पत्र पाठवले. या पत्रात अरविंदजी यांनी देशातील जनतेला 6 हमी दिल्या आहेत. भारतात इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर पुढील 5 वर्षांत या 6 हमींची पूर्तता केली जाईल.
काय आहेत अरविंद केजरीवाल यांच्या 6 हमी?1. संपूर्ण देशात 24 तास वीज दिली जाईल.2. देशभरातील गरिबांना मोफत वीज मिळेल.3. सर्व गावात अतिशय चांगल्या शाळा सुरू होतील आणि त्यात सर्वांना समान शिक्षण मिळेल.4. आम्ही प्रत्येक गावात आणि परिसरात मोहल्ला क्लिनिक स्थापन करू आणि प्रत्येक व्यक्तीसाठी मोफत उपचाराची व्यवस्था करू.5. स्वामिनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी भाव दिला जाईल.6. दिल्लीच्या लोकांना पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात येईल.
संबधित बातमी- 'देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल', INDIA आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा BJP वर घणाघात
केजरीवालांनी पत्रात आणखी काय म्हटले?सुनीता केजरीवाल म्हणाल्या, भाजपचे लोक म्हणतात की केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा. पण, तुमचे केजरीवाल 'शेर' आहेत. केजरीवाल करोडो लोकांच्या हृदयात राहतात. अरविंद केजरीवाल यांच्या पत्रात लिहिले की, माझ्या प्रिय भारतीयांनो, तुरुंगातून तुमच्या या भावाच्या शुभेच्छा स्वीकारा. मी तुमची मते मागत नाहीये. मी 140 कोटी भारतीयांना नवीन भारत घडवण्यासाठी आमंत्रित करतो. भारत हा एक महान देश आहे, एक महान संस्कृती. देशाची लूट करणाऱ्या लोकांचा भारत माता तीव्र तिरस्कार करते. आज देशातील प्रत्येक हाताला काम मिळाले पाहिजे, प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. पत्राच्या शेवटी अरविंद केजरीवाल म्हणतात की, मी तुरुंगात असूनही निरोगी आणि उर्जेने भरलेलो आहे. मी लवकरच बाहेर येऊन तुम्हाला भेटेन.
रॅलीत हे नेते सहभागी झाले...लोकसभा निवडणुकीपूर्वी I.N.D.I.A. आघाडीतील 27 पक्षांनी रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर लोकशाही वाचवा रॅली काढली. राहुल आणि प्रियांका गांधी यांच्याशिवाय शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि समाजवादी प्रमुख अखिलेश यादवही आले. त्यांच्यासोबत शिवसेना (यूबीटी) संजय राऊत, सीपीआय(एम) सरचिटणीस सीताराम येचुरी, आदित्य ठाकरे, एनसीपी प्रमुख शरद पवार, आप नेते आतिशी, गोपाल राय, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्लाही उपस्थित आहेत. याशिवाय, जमीन विक्री भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेनही या रॅलीत सहभागी झाल्या होत्या.