INDIA Alliance Meet: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज(19 डिसेंबर) राजधानी दिल्लीत विरोधकांच्या INDIA आघाडीची चौथी बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा आणि एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्वात मोठी गोष्ट पंतप्रधानांच्या चेहऱ्याबाबत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी विरोधकांकडून पंतप्रधानपदासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही याला पाठिंबा दिला.
काय म्हणाले खर्गे?तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या प्रस्तावावर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आधी आपण निवडणूक जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आमचे प्राधान्य जिंकण्यावर आहे. खासदार नसतील तर पंतप्रधान पदाबद्दल काय बोलावे? संख्या वाढवण्यासाठी एकत्र लढून बहुमत मिळवण्याचा प्रयत्न करू. मोदींना प्रचंड गर्व आला आहे की, संपूर्ण जगात मीच एकटा नेता आहे. त्यामुळे आम्ही आधी जिंकण्याचा प्रयत्न करू.
पुढे काय होणार?खर्गे पुढे म्हणाले की, आजच्या चौथ्या बैठकीत 28 पक्षांनी सहभाग घेतला होता. या सर्व पक्षाच्या नेत्यांनी त्यांची मते समितीसमोर ठेवली आहेत. समस्या सोडवण्याकरता संपूर्ण देशभर 8 ते 10 बैठका घेणार आहोत. 151 खासदारांना सभागृच्या बाहेर टाकून सरकार चालवत आहे. हे लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकशाहीला वाचवायची असेल तर आपल्याला एकत्र येऊन लढावे लागेल. खासदारांच्या निलंबनाविरोधात आम्ही 22 डिसेंबरला आंदोलन करणार आहोत.
जागा वाटपाचे काय ?जागा वाटपाबाबत खर्गे म्हणाले की, सर्वजण एकत्र येऊन काम करणार आहोत. त्या-त्या राज्यात स्थानित नेतृत्व जागावाटपाबाबत एकमेकांशी तडजोड करणार आहे. तसे करता येत नसेल तर आम्ही निर्णय घेऊ. वाद झाल्यास आघाडीचे वरिष्ठ नेते हस्तक्षेप करतील. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, उत्तर प्रदेशातील समस्या यामुळे सुटतील. दिल्ली आणि पंजाबमध्येही आघाडी होईल आणि तिथली स्थानिक समस्या दूर होईल. दरम्यान, इंडिया आघाडी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जागावाटपाबाबत निर्णय घेऊ शकते, अशीही माहिती समोर आली आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही सांगितले की, सर्व पक्ष लवकरच जागावाटप करून मैदानात उतरण्यास तयार आहेत. लवकरच जागांचे वाटप होणार आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणाले की, प्रत्येक राज्यात जो सर्वात मोठा पक्ष आहे, त्यांनी नेतृत्व करावे.
संयुक्त रॅली होणारयेत्या काही दिवसांत इंडिया आघाडी देशभरात सुमारे दहा मोर्चे काढणार असल्याची माहिती आहे. आघाडीच्या प्रमुख नेत्यांची पहिली सभा बिहारची राजधानी पाटणा येथून सुरू होऊ शकते. या बैठकीत जुन्या वादांवरही चर्चा झाल्याची माहिती आहे. आता आघाडीच्या मोठ्या बैठकांऐवजी आघाडीने स्थापन केलेली बॅक चॅनल समिती भविष्यातील रणनीतीवर काम करेल.