नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत विरोधकांच्या INDIA आघाडीची चौथी बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर एकमत झाले, पण आता या बैठकीबाबत एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीत कोणत्याही गंभीर विषयावर चर्चा झाली नसल्याचा दावा JDU खासदार सुनील कुमार पिंटू यांनी केला आहे.
फक्त चहा-बिस्किटावर बैठक संपवलीवृत्तसंस्था एएनआयशी संवाद साधताना सुनील कुमार पिंटू म्हणाले की, या बैठकीला सर्व पक्षांचे बडे नेते आणि मुख्यमंत्री उपस्थित होते, पण यात गंभीर विषयांवर चर्चा झालीच नाही. काँग्रेसने अलीकडेच सांगितले होते की, त्यांच्याकडे निधीची कमतरता आहे. त्यामुळेच ते 138 रुपये, 1380 रुपये किंवा 13,800 रुपये देणगी मागत आहेत. म्हणूनच कालची बैठक समोशाशिवाय फक्त चहा आणि बिस्किटांवर संपली. आधीच्या बैठकीत समोसा मिळाला होता.
INDIA आघाडीच्या बैठकीत या मुद्द्यांवर एकमतINDIA आघाडीच्या चौथ्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी विरोधकांकडून पंतप्रधानपदासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे केले आहे. ममता बॅनर्जींच्या प्रस्तावावर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आधी आपण निवडणूक जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आमचे प्राधान्य जिंकण्यावर आहे. खासदार नसतील तर पंतप्रधान पदाबद्दल काय बोलावे? संख्या वाढवण्यासाठी एकत्र लढून बहुमत मिळवण्याचा प्रयत्न करू. मोदींना प्रचंड गर्व आला आहे की, संपूर्ण जगात मीच एकटा नेता आहे. त्यामुळे आम्ही आधी जिंकण्याचा प्रयत्न करू.
जागा वाटपाचे काय ?जागा वाटपाबाबत खर्गे म्हणाले की, सर्वजण एकत्र येऊन काम करणार आहोत. त्या-त्या राज्यात स्थानित नेतृत्व जागावाटपाबाबत एकमेकांशी तडजोड करणार आहे. तसे करता येत नसेल तर आम्ही निर्णय घेऊ. वाद झाल्यास आघाडीचे वरिष्ठ नेते हस्तक्षेप करतील. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, उत्तर प्रदेशातील समस्या यामुळे सुटतील. दिल्ली आणि पंजाबमध्येही आघाडी होईल आणि तिथली स्थानिक समस्या दूर होईल. दरम्यान, इंडिया आघाडी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जागावाटपाबाबत निर्णय घेऊ शकते, अशीही माहिती समोर आली आहे.