I.N.D.I.A. Alliance: लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे विविध पक्ष आणि नेते बैठका घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर 'INDIA' आघाडीतील दोन महत्त्वाच्या घटक पक्षांचे नेते आज एकत्र दिसले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शुक्रवारी (6 ऑक्टोबर) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, I.N.D.I.A. आघाडीच्या आगामी योजना आणि रणनीती आखण्याबाबत, या नेत्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या अधिकृत X हँडलवर या भेटीचे फोटो पोस्ट केले. "देशातील जनतेचा आवाज मजबुत करण्यासाठी मी आणि राहुल गांधी यांनी शरद पवारांची भेट घेतली. आम्ही प्रत्येक आव्हानासाठी तयार आहोत. भाजत एकत्र होणार, इंडिया जिंकणार." असे कॅप्शन त्यांनी या फोटोसोबत लिहिले. यावेळी शरद पवारांसोबत जितेंद्र आव्हाडदेखील (Jitendra Awhad) उपस्थित होते.
लवकरच इंडिया आघाडीची बैठक होणार
31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत झालेल्या विरोधी आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांनी मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी आघाडीची आणखी एक बैठक लवकरच होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी बैठक महत्वाची असणार आहे.
दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी नऊ सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीमध्ये (शिवसेना (यूबीटी), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील प्रत्येकी तीन नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी (5 ऑक्टोबर) एमव्हीएच्या समन्वय समितीच्या स्थापनेला दुजोरा दिला.
उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 आणि महाराष्ट्रात 48 जागा आहेत. चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्व इतर मित्र पक्षांसोबत बैठक घेऊन जागावाटप चर्चेत आपली भूमिका ठरवेल, त्यानंतर मित्रपक्षांशी चर्चा करून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला जाईल.