पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर लोकसभा निवडणुकीला एकट्याने सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता टीएमसी स्वबळावर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्याकडून काँग्रेसला केवळ 2 जागांचीच ऑफर देण्यात आली होती. यामुळे काँग्रेस नाराज होती. अखेर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर राग व्यक्त करत विरोधकांच्या INDIA मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे बंगालमध्ये INDIA मध्ये पहिली फूट पडली आहे. तेथे विरोधकांची आघाडी ढेपाळली आहे. आता उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाबमध्ये काय होणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. कारण येथील परिस्थितीही फारशी वेगळी नाही. येथे जागावाटपासंदर्भात एक मेकांना प्रस्ताव दिले गेले आहेत. मात्र अद्याप एकमत झालेले नाही.
बिहारमध्ये जेडीयू आणि आरजेडी यांच्यातच अद्याप लोकसभा जागावाटपासंदर्भात सहमती झालेली नाही. याशिवाय काँग्रेस आणि सीपीआय यांच्यातही पेच आहे. काँग्रेसकडून साधारणपणे अर्धा डझन जागा बिहारमध्ये मागत आहे. मात्र नितीश कुमार आणि लालू यादव काँग्रेसला एवढ्या जागा देण्यास अनुकूल नाहीत.
अशीच स्थिती उत्तर प्रदेशातही आहे. नुकतीच अखिलेश यादव यांच्यासोबत काँग्रेसच्या आघाडी समितीची बैठक झाली होती. या बैठकीत काँग्रेसने तब्बल 20 जागांचा प्रस्ताव ठेवल्याचे सांगितले जाते. त्यांनी 2009 चा फॉर्म्युला समोर ठेवत मध्य यूपीतील अधिकांश जागांवर दावा केला असून अखिलेश यादव यांच्याकडे 20 जागा मागितल्या आहेत.
अखिलेशही घेऊ शकतात ममतांसारखी भूमिका - काँग्रेसच्या 20 जागांच्या प्रस्तावानंतर सपा देखील नाखूश आहे. भाजपासोबत थेट टक्कर घेतल्यास काँग्रेस कमकुवत होईल आणि त्यांच्यासाठी जागा काढणे अवघड होईल, असे सपाचे मत आहे. महत्वाचे म्हणजे, खुद्द राहुल गांधी यांनाही अमेठीमद्ये आपली जागा राखता आलेली नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेस सुल्तानपूर, अमेठी, रायबरेली, शाहजहांपूर, धौरहरा, गाजियाबादसह जवळपास 20 जागांवर दावा करत आहे. या जागा आम्हाला देण्यात याव्यात कारण 2004 अथवा 2009 मध्ये आपण या जागांवर विजय मिळवला होता असा त्यांचा युक्तीवाद आहे. तर 2017 च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता काँग्रेसला जागा देणे, म्हणजे, विजयाची शक्यता कमी करण्यासारखे होईल, असे अखिलेश यादव यांना वाटते आहे. तेव्हा सपाने काँग्रेसला 100 जागा दिल्या होत्या. मात्र त्यांना केवळ 7 जागा मिळाल्या होत्या.
पंजाबमध्ये काय होणार...?काहीशी अशीच परिस्थिती पंजाबातही आहे. येथे आम आदमी पार्टी सत्तेवर आहे. लोकसभेतही आपल्याला मोठे यश मिळेल अशी त्यांची धारणा आहे. तर दुसरीकडे आपले 8 खासदार आहेत त्या पेक्षा कमी जागांवर आपण लढणार नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे येथेही काय होते हे बघण्यासारखे असणार आहे.