२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्तापरिवर्तन घडवून आणण्यासाठी इंडिया आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र त्याचदरम्यान बसपा प्रमुख मायावती यांनी आज स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा करत भाजपाचा बालेकिल्ला बनलेल्या उत्तर प्रदेशात विरोधी ऐक्य साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या इंडिया आघाडीच्या प्रयत्नांना सुरुंग लावला आहे. मायावती यांनी आगामी लोकसभा आणि चार राज्यांत होणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. मायावतींच्या या घोषणेमुळे इंडिया आघाडीतील घटक पक्ष प्रक्षुब्ध झाले असून, लालू प्रसाद यादव यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
लालूप्रसाद यादव म्हणाले की, आम्ही मायावती यांना इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलेलं नाही. निवडणुका जवळ येत आहेत. आता आम्ही पुढील तयारी करत आहोत. यावेळी लालू प्रसाद यादव यांना इंडिया आघाडीचा संयोजक कोण होईल, मल्लिकार्जुन खर्गे की नितीश कुमार असं विचारलं असता, याबाबतचा निर्णय उद्याच्या बैठकीत होईल, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, स्वबळावर लढण्याच्या मायावती यांच्या घोषणेवर इतर पक्षांकडूनही प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काँग्रेस प्रवक्ते सुरेंद्र राजपूत म्हणाले की, मायावती यांना इंडिया आघाडीमध्ये येण्यासाठी काँग्रेसनं कुठलंही विनंतीपत्र पाठवलं नव्हतं. त्या आता दलिताची मुलगी राहिल्या नसून दौलतीच्या कन्या झाल्या आहेत. तर समाजवादी पक्षाच्या जुही सिंह यांनी मायावतींवर टीका करताना म्हटले की, मायावती ह्या भाजपासोबत आहेत. त्यामुळे त्या इंडियाचा भाग बनलेल्या नाहीत. त्या बाहेर राहून भाजपाला फायदा पोहोचवत आहेत. जनतेला सगळं कळतंय.