आदेश रावल -
नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचाराबाबत संसदेत आधीपासूनच कोंडी झालेली आहे. आता हरयाणातील मेवात येथे दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मुद्दाही जोर धरत आहे. दोन्ही सभागृहांत मणिपूर व हरयाणाबाबत विरोधकांनी मंगळवारी गदारोळ केला. याच मुद्द्यावर विरोधी पक्षांची इंडिया आघाडी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे.
ज्या विरोधी पक्षांच्या खासदारांनी अलीकडेच मणिपूरमध्ये जाऊन तेथील स्थितीचा आढावा घेतला होता, बहुतांश तेच खासदार राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. तेथील स्थितीची माहिती देणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी वेळ मागितला होता. या भेटीत आधी केवळ मणिपूरच्या विषयावर चर्चा होणार होती. परंतु, आता हरयाणातील हिंसाचाराचा विषयही यासोबत जोडण्यात आला आहे.
माईक बंद केला जातो...- खरगे यांनी आरोप केला आहे की, सभागृहात आम्ही वारंवार उभे राहिलो तर मोठी शिक्षा मिळेल, असे सांगितले जाते. हे सर्व सभापतींकरवी सरकार करीत आहे. आधी राज्यसभा सदस्य रजनी पाटील यांना एक सत्रासाठी निलंबित केले होते. - परंतु, अद्याप त्यांचे निलंबन परत घेण्यात आले नाही. संजय सिंह यांनी प्रश्न विचारला तर त्यांनाही निलंबित करण्यात आले. - विरोधकांच्या बोलण्यावर सत्ताधारी पक्षाचे खासदार आरडाओरडा करतात आणि माईक बंद केला जातो. ही लोकशाही नव्हे तर हुकूमशाही आहे.