अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आटोपली असून, सात टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आहे. आता काही वेळातच विविध संस्थांकडून करण्यात आलेल्या एक्झिट पोलचे आकडे समोर येणार आहे. मात्र एक्झिट पोलचे आकडे समोर येण्यापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा दावा करतानाच जागांचा आकडाही सांगितला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला २९५ हून अधिका जागांवर विजय मिळेल, असा दावा मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.
सातव्या टप्प्यातील मतदान आटोपत असतानाच मतमोजणी आणि निकालांनंतरची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये इंडिया आघाडीतील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. दरम्यान, यावेळी मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की इंडिया आघाडी २९५ हून अधिक जागांवर जय़ मिळवले. हा जनतेचा सर्वे आहे. एक्झिट पोलवर भाजपावाले चर्चा करतील. तसेच नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतील. मात्र आम्ही एक्झिट पोलचं सत्य जनतेसमोर आणू इच्छितो. आम्ही २९५ पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवत आहोत. इंडिया आघाडीच्या जागा यापेक्षा कमी येणार नाहीत.
दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने इंडिया आघाडीच्या माध्यमातून मोदी आणि भाजपासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. त्यामुळे अनेक राज्यांत भाजपा आणि इंडिया आघाडीमध्ये अटीतटीची लढत झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आता एक्झिट पोलमधून काय आकडे समोर येतात. याबाबच उत्सुकता निर्माण झालेली आहे.