"INDIA आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी होती..."; आणखी एका मित्रपक्षाचा काँग्रेसला झटका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 18:41 IST2025-01-08T18:40:15+5:302025-01-08T18:41:25+5:30
इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीपुरती होती. त्यामुळे काँग्रेस आणि आम आदमी पक्षात वाद होणे हे अस्वाभाविक नाही असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं.

"INDIA आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी होती..."; आणखी एका मित्रपक्षाचा काँग्रेसला झटका?
पटना - इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकीसाठी होती असं विधान आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी केल्यानं काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाच्या वादात तेजस्वी यादव यांनी हे विधान केले. बिहार विधानसभा निवडणूक आणि दिल्ली निवडणुकीवर तेजस्वी यादव यांनी आरजेडीची भूमिका स्पष्ट केली.
तेजस्वी यादव यांच्या विधानामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ माजली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच तेजस्वी यादव यांनी केलेले विधान काँग्रेससाठी चिंताजनक आहे. इंडिया आघाडी आता भूतकाळ झाली. ही आघाडी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी बनवण्यात आली होती. आता पुढच्या निवडणुकीत त्याचा फार अर्थ नाही असं त्यांनी सांगितले. पत्रकारांनी तेजस्वी यादव यांना दिल्लीत आप आणि काँग्रेसमधील वादावर प्रश्न विचारला होता त्यावरून तेजस्वी यादव यांनी हे उत्तर दिले.
इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीपुरती होती. त्यामुळे काँग्रेस आणि आम आदमी पक्षात वाद होणे हे अस्वाभाविक नाही असं तेजस्वी यादव यांनी म्हटल्याने राष्ट्रीय जनता दलही काँग्रेससोबत कुठल्याही प्रकारे आघाडी करण्यास उत्सुक नसल्याचं दिसून येते. बिहार विधानसभा निवडणुकीबाबत अद्याप पक्षाने निर्णय घेतला नाही. दिल्लीत निवडणूक लढवायची की नाही हे ठरले नाही असंही तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केले. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आपने भाजपाविरोधात एकत्रित निवडणूक लढवली होती परंतु विधानसभेला हे दोन्ही पक्ष वेगळे निवडणुकीत उतरले आहेत. समाजवादी पक्षानेही आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
दरम्यान, बिहारमध्ये याच वर्षी विधानसभा निवडणूक होणार असून त्यात राजद आणि काँग्रेस एकत्रित लढतील असं बोलले जाते परंतु जागावाटपावरून दोन्ही पक्षात चढाओढ सुरू आहे. काँग्रेसने कमीत कमी ७० जागा लढाव्यात असं स्थानिक नेते सांगतात त्याशिवाय जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाचीही मागणी केली आहे. त्याचवेळी तेजस्वी यादव यांनी केलेले विधान काँग्रेसला संकेत दिल्याचीही चर्चा आहे.