I.N.D.I.A. च्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची घोषणा केव्हा होणार? ममता बॅनर्जी यांनी स्पष्टच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 08:53 PM2023-12-18T20:53:20+5:302023-12-18T20:53:47+5:30
ममता बॅनर्जी यांनी सोमवारी I.N.D.I.A. च्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारासंदर्भात मोठा खुलासा केला आहे.
देशातील लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. मात्र, I.N.D.I.A. कडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? यावर अद्यापही सस्पेन्स कायम आहे. पण ममता बॅनर्जी यांनी सोमवारी I.N.D.I.A. च्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारासंदर्भात मोठा खुलासा केला आहे.
केव्हा होणार घोषणा -
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी माध्यमांसोबत बोलताना म्हणाल्या, 'I.N.D.I.A.' चा पंतप्रधानपदाचा उमेदवार 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ठरवला जाईल. तसेच, जागावाटप व्यतिरिक्त, विरोधी आघाडी अद्यापही न सुटलेले प्रश्नही सोडवेल. यानंतर 'I.N.D.I.A.' भारतीय जनता पक्षाला हरवण्याचे काम करेल.
हिंदी भाषीक राज्यांसोबत भेदभाव करत नाही -
हिंदी भाषीक राज्यांतील भाजपच्या ताकदीसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ममता म्हणाल्या, "भाजप मजबूत नाही, तर आम्ही कमकूवत आहोत. जर याचा सामना करायचा असेल तर, सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल. एवढे नाही, तर यावेळी मी हिंदी भाषीक राज्ये आणि इतर राज्यांमध्ये भेदभाव करत नाही," असेही ममता यांनी म्हटले आहे.
भाजप भयभीत -
आज (18 डिसेंबर) लोकसभा आणि राज्यसभेतून मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करण्यात आले. यावर बोलताना ममता म्हणाल्या, विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनावरून स्पष्ट होते की, भाजप भयभीत झाला आहे. दोन राज्यांत विजय मिळाल्याने भाजपचा अहंकार वाढला आहे. यामुळेच त्यांनी कासदारांना निलंबित केले. भाजपकडे संसद चालविण्याचा नैतिक अधिकार नाही आणि ही लोकशाहीची थट्टा आहे.