नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. देशात भाजपप्रणित एनडीए आणि काँग्रेससह इंडिया आघाडीविरुद्ध देशात राजकीय सामना रंगणार आहे. एनडीएकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे दावेदार असणार आहेत. नुकतेच, लाल किल्ल्यावरील भाषणातूनही त्यांनी मी पुन्हा येईन असे म्हणत आपणच एनडीए आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार अद्याप निश्चीत करण्यात आला नाही. आता, काँग्रेस नेते पी.एल. पुनिया यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारासंदर्भात माहिती दिली.
इंडियन नॅशनल डेवलेपमेंट इन्क्लूसिव अलायंस म्हणजेच इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाचा उमेदवार हा २०२४ च्या निवडणुकीतील विजयानंतर ठरवण्यात येणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जिंकणारे सर्व खासदार आपला पंतप्रधान ठरवतील, असे पी.एल.पुनिया यांनी सांगितले. त्यामुळे, तूर्तास इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदासाठी कोणताही उमेदवार निश्चित होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून भाजपा नेत्या स्मृती इराणी यांचा पराभव होईल, असा दावाही पुनिया यांनी केला आहे. येथून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या उमेदवाराच निश्चितच विजय होईल, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, जदयू, राजद यांसह एकूण २८ राजकीय पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या दोन बैठका पार पडल्या असून पहिली बैठक पाटणा येथे तर दुसरी बैठक बंगळुरू येथे संपन्न झाली. आता, इंडिया आघाडीची तिसरी आणि महत्त्वाची बैठक मुंबईत होत असून शिवसेनेसह महाविकास आघाडीकडून या बैठकीचं यजमानपद सांभाळण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडल्यामुळे या बैठकीकडे आणि शरद पवारांच्या बैठकीतील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.