‘इंडिया’ आघाडी भाजपला धूळ चारेल; भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 06:27 AM2024-01-17T06:27:57+5:302024-01-17T06:28:15+5:30
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाशी संबंधित प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने २२ जानेवारीच्या सोहळ्याला पूर्णपणे राजकीय रंग दिला आहे.
कोहिमा : अयोध्येतील २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला राजकीय व पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच रा. स्व. संघाच्या कार्यक्रमाचे स्वरूप देण्यात आले आहे. हा निवडणूक कार्यक्रम झाला आहे. त्यामुळेच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी या सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे सांगितले.
भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. इंडियाची स्थिती भक्कम आहे. जागावाटपाचा मुद्दाही लवकर सोडवला जाईल. इंडिया आघाडी या लोकसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारेल, असा दावा त्यांनी केला.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाशी संबंधित प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने २२ जानेवारीच्या सोहळ्याला पूर्णपणे राजकीय रंग दिला आहे. हा संघ आणि भाजपचा कार्यक्रम बनला आहे. त्यामुळेच काँग्रेस अध्यक्षांनी या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले, असे ते म्हणाले.
‘छोट्या राज्याचे’ असला तरीही तुम्ही बरोबरीचे
नागालँडचे लोक ‘छोट्या राज्याचे’ असले तरी त्यांनी स्वत:ला देशातील इतर लोकांच्या बरोबरीचे समजले पाहिजे, असे राहुल म्हणाले.
लोकांना न्याय देणे तसेच राजकारण, अर्थव्यवस्थेला सर्वांसाठी समान व सुलभ बनविणे हा या यात्रेचा उद्देश आहे. तुमचे राज्य लहान असले तरी काही फरक पडत नाही, तुम्ही स्वतःला देशातील इतर लोकांच्या बरोबरीचे समजले पाहिजे, असे ते म्हणाले.
राहुल गांधी एका वेगळ्याच जगात राहतात : भाजप
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंदर्भात केलेल्या टिपण्णीवरून भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. ते वेगळ्याच जगात राहतात आणि खोटे बोललो तरी सुटून जाऊ, असे त्यांना वाटते, असा घणाघात केंद्रातील या सत्ताधारी पक्षाने केला. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते राजीव चंद्रशेखर म्हणाले की, हिंदूंच्या श्रद्धेवर प्रभाव पाडला जाऊ शकतो, यावर लोकांनी विश्वास ठेवावा, असे राहुल यांना वाटते.