नवी दिल्ली : देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया समूहातील घटक पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी येथे एक अनौपचारिक बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या तयारी आणि रणनीतीवर यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच या निवडणुकीत इंडिया आघाडीला २९५ पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने केला आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीत, विरोधी आघाडीतील घटक पक्ष 'एक्झिट पोल' (निवडणुकोत्तर सर्वेक्षण) संबंधित दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होतील, असाही निर्णय घेण्यात आला, जेणेकरून भाजपच्या छुप्या अजेंड्याला लोकांसमोर आणता येईल. तसेच इंडिया आघाडीने असेही ठरवले की, ते आपल्या स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि विजयाचा पुरावा मिळेपर्यंत सतर्क राहण्याच्या सूचना देईल. इंडिया आघाडीने रविवारी निवडणूक आयोगाकडे बैठक घेण्यासाठी वेळ मागितली आहे, जेणेकरून ते त्यांच्यासमोर मतमोजणीशी संबंधित समस्या आणि तक्रारी मांडू शकतील आणि त्यावर तोडगा काढण्याची मागणी करतील.
आम्हाला जनतेला सत्य सांगायचे आहे : खरगेबैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 'इंडिया' आघाडीच्या पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत पत्रकारांना सांगितले की, आमच्या नेत्यांसोबत केलेल्या चर्चेनंतर विचारल्यास 'इंडिया' आघाडीला किमान २९५ जागा मिळतील.यापेक्षाही जास्त जागा मिळतील असे आमचे अंतर्गत आकलन आहे. २९५ जागा एक सार्वजनिक सर्वेक्षण आम्हाला देत आहे. एक्झिट पाेलमधील आकडे फुगविलेले आहेत. सरकारी एक्झिट पाेलमधून सत्ताधारी खाेटे दावे करत आहेत. तर, आम्हाला जनतेला सत्य सांगायचे आहे, असे खरगे म्हणाले.