हरीश गुप्ता
नवी दिल्ली : सात राज्यांतील १३ विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांत इंडिया आघाडीने १० जागा जिंकून भाजपला जबर झटका दिला आहे. भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. एक जागा अपक्षास मिळाली.
इंडिया आघाडीतून काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप आणि द्रमुक यांनी उमेदवार रिंगणात उतरवले होते. हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, पंजाब, मध्य प्रदेश, बिहार आणि तामिळनाडू या राज्यांत या पोटनिवडणुका झाल्या. बुधवारी मतदान झाल्यानंतर शनिवारी मतमोजणी झाली.
लोकसभेतील कल विधानसभेत कायम
यंदा देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या. त्यानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटल्या होत्या. हा कल विधानसभा पोटनिवडणुकीत अधिक मजबूत झाल्याचे या निकालातून दिसून येत आहे.
२२ जुलैपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात विरोधक आणखी आक्रमक होतील, अशी शक्यता या निकालामुळे बळावली आहे.