इंडियन मुजाहिद्दीन आणि ईस्ट इंडियामध्येही "INDIA"; विरोधकांच्या आघाडीवर PM मोदींचा मोठा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 12:31 PM2023-07-25T12:31:02+5:302023-07-25T12:32:42+5:30
मोदी म्हणाले, केवळ "इंडिया" नाव ठेवल्यानं होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीनेही "इंडिया" लावले होते आणि इंडियन मुजाहिदीनच्या नावातही "इंडिया" आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूर मुद्द्यावरून जबरदस्त संग्राम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक पार पडली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आघाडीवर मोठा हल्ला चढवला. मोदी म्हणाले, केवळ "इंडिया" नाव ठेवल्यानं होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीनेही "इंडिया" लावले होते आणि इंडियन मुजाहिदीनच्या नावातही "इंडिया" आहे.
मोदी म्हणाले, विरोधक विखुरलेले आहेत. हताश आहेत. त्यांना आणखी बराच काळ सत्तेत येण्याची इच्छा नाही, असे त्यांचा दृष्टीकोन पाहता दिसते. यावेळी त्यांनी 15 ऑगस्टला प्रत्येक घरावर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचीही माहिती दिली. या पावसाळी अधिवेशन काळातील ही संसदीय पक्षाची पहिलीच बैठक होती. ही बैठक संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये पार पडली.
यावेळी गृह मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
खरे तर, सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरमधील घटनेवरून गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावर पंतप्रधान मोदीनी बोलावे आणि संसदेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधक करत आहेत. तर, गृहमंत्री अमित शाह यांच्या उत्तराने सरकार अल्पकालीन चर्चेसाठी तयार आहे. मात्र या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी बोलावे, यावर विरोधक ठाम आहेत.