ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ : भारत आणि बांगलादेश १९७१ च्या बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यावर आधारित माहितीपटाची संयुक्तरीत्या निर्मिती करतील, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून जाहीर कऱण्यात आले आहे. २०२० मध्ये बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असून, या निर्मितीत भारताचेही योगदान असेल.
माहिती व प्रसारणमंत्री एम. व्यंकय्या नायडू आणि बांगलादेशचे माहितीमंत्री हसन उल हक इनू यांच्यात आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले. १९७१ च्या बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यावर माहितीपटाची निर्मिती करण्यासाठी फिल्म डिव्हिजन, दूरदर्शन आणि इतर सरकारी माध्यम संस्थांकडे उपलब्ध सामग्रीचा पुरेपूर वापर करण्यात येईल, असे नायडू म्हणाले. बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यास २०२१ मध्ये ५० वर्षे पूर्ण होणार असून, हा माहितीपट या स्वातंत्र्य लढ्याला समर्पित असेल, असेही त्यांनी सांगितले.