नवी दिल्ली, दि. 14 - दहशतवादाविरोधात कारवाई करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्यावर तसंच झीरो टॉलरन्स भूमिका स्विकारण्यावर भारत आणि जपानचं एकमत झालं आहे. विशेष म्हणजे यावेळी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचा उल्लेख करण्यात आला. आधीच ब्रिक्स परिषदेत पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचा उल्लेख करत कारवाई करण्यावर एकमत झालं असताना, भारत आणि जपानने पाकिस्तानच्या अडचणींमध्ये वाढ केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी संयुक्त घोषणापत्रात पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचा उल्लेख केला आहे. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचा घोषणापत्रात उल्लेख आहे. दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान ठरणा-या ठिकाणांना नेस्तनाभूत करणं, तसंच दहशतवाद्यांना मिळणा-या पायाभूत सुविधा रोखणं, नेटवर्क जाळं आणि आर्थिक मदतीची नाकेबंदी करणं, सोबतच सीमारेषेवरील हालचाली रोखमं यासाठी दोन्ही देश प्रयत्न करणार आहेत.
मुंबई 26/11 दहशतवादी हल्ला आणि 2016 पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा जेव्हा कधी उल्लेख होतो तेव्हा दोन्ही देश थेट पाकिस्तानचा उल्लेख करतात. दोन्ही देशाच्या नेत्यांनी या दहशतवादी हल्ल्यांचा कट रचणा-यांना शिक्षा करण्यासाठी आपण बांधील आहोत असंही सांगितलं आहे.
तप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते करण्यात आले. अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकाजवळ प्रकल्पाचे भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. या नवीन प्रकल्पामुळे मुंबई-गुजरातमधील अंतर अवघ्या तीन तासांत कापणं शक्य होणार आहे. हा प्रकल्प 1 लाख 8 हजार कोटी रुपयांचा आहे व 2022पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, बुलेट ट्रेन भारताला जवळपास मोफतच मिळाली आहे. या प्रकल्पासाठी कर्जपुरवठा करणारे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचे मोदींनी आभारही मानले.
'जय जपान, जय इंडिया'चा नारादरम्यान, बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात केलेल्या भाषणात आबे यांनी भारत आणि जपानच्या मैत्रीला एक उत्तम उदाहरण सांगत एक नवीन नारा देखील दिला. ते म्हणाले की, जपानचा 'ज' आणि इंडियाचा 'आय' हे अक्षरं मिळून जय शब्द तयार होते म्हणजे विजय होते. 'जय जपान, जय इंडिया'ला साकार करण्यासाठी दोन्ही एकत्र मिळून काम करतील
'पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्टी असलेले नेते' आपल्या भाषणामध्ये शिंजो आबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही भरभरुन कौतुक केले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत', अशा शब्दांत शिंजो आबे यांनी मोदींचं कौतुक केले. '10 वर्षांपूर्वी मला भारताच्या संसदेला संबोधित करण्याची संधी मिळाली होती. जपान आणि भारताचे संबंध म्हणजे हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागराचा संगम आहेत. माझे मित्र पंतप्रधान मोदी हे दूरदृष्टी असलेले नेते असून बुलेट ट्रेनचे स्वप्न करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली आहे,’ असेही आबे म्हणालेत.
जाणून घेऊया मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची वैशिष्ट्यं1 . बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमत 1 लाख 8 हजार कोटी रुपये आहे. या बुलेट ट्रेनसाठी जपाननं 88 हजार कोटीचं कर्ज दिलं आहे. हे कर्ज 0.1% व्याज दराने मिळणार आहे. 50 वर्षात हे कर्ज फेडावे लागणार आहे. 2. या प्रकल्पांतर्गत काही ट्रेन जपानहून येणार आहेत तर काही ट्रेन्सची निर्मिती भारतातच केली जाणार आहे. 3. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मेक इन इंडिया योजनेची ताकद वाढण्यास मदत होईल. 4. तंत्रज्ञान तसेच औद्योगिक क्षेत्राचाही यानिमित्तानं विकास होण्यास मदत होईल 5. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे 24 हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे म्हटले जाते आहे. 6. 1 लाख 8 हजार कोटीं रुपयांच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्प मुंबई ते अहमदाबादचे 508 किलोमीटरचे अंतर ताशी 350 कि.मी. वेगाने पूर्ण होईल. महाराष्ट्रातील 156 कि.मी., गुजरातमधील 351 कि.मी. या टप्प्यातून ही ट्रेन धावणार आहे. 7. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रवास सुरू होणार असून ते पुढे ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, साबरमती असे 12 स्टेशन असतील. 8. या प्रकल्पासाठी 700 हेक्टरहून अधिक जमीन संपादित करण्यात येणार असून, ठाणे-वाशी भागातून 7 किमी समुद्राखालून ही ट्रेन धावणार आहे. याशिवाय ही रेल्वे मुंबईतून 15 किमी भूमिगत मार्गाने जाणार आहे. 9. अहमदाबाद-मुंबई अंतर रेल्वेनं पार करण्यासाठी सध्या 7 ते 8 तास लागतात. मात्र बुलेट ट्रेनमुळे हे केवळ तीन तासांत हे अंतर पार करता येणार आहे. 10. बडोदा शहराजवळ ही रेल्वे ४५ डिग्रीचे वळण घेणार आहे.