नवी दिल्ली : एक दिवस भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे तीन देश पुन्हा एक होतील, असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विश्वास आहे. हे तिन्ही देश एक होतील, पण युद्धाच्या माध्यमातून नव्हे, तर लोकांच्या सद्भावनेतून (पॉप्युलर गुडविल) ते एक होतील, असे मत भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी व्यक्त केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारच्या रात्री पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना भेटण्यासाठी लाहोरला आकस्मिकपणे भेट दिली, त्याच रात्री माधव यांनी हे विधान केले. ‘लोकांना वाटत असेल तर (पॉप्युलर गुडविल) ६० वर्षांपूर्वी काही ऐतिहासिक कारणांमुळे वेगवेगळे झालेले हे तिन्ही भूभाग पुन्हा एकदा एकत्र येतील आणि पुन्हा अखंड भारत निर्माण होईल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अद्यापही वाटत आहे,’ असे राम माधव म्हणाले. ते अल-जझीरा या दोहा येथील टीव्ही वाहिनीशी बोलत होते. ‘आरएसएसचा एक स्वयंसेवक या नात्याने माझेही असेच मत आहे,’ अशी पुष्टी माधव यांनी जोडली. याचा अर्थ आम्ही एखाद्या देशाशी युद्ध केले पाहिजे, त्या देशाला आपल्यात सामील करून घेतले पाहिजे असा नाही. हे तिन्ही देश एक दिवस पुन्हा एक होतील, याचा अर्थ आम्ही त्या देशांसोबत युद्ध करावे असा होत नाही. आपण युद्ध न करता लोकांच्या सहमतीने आणि सद्भावनेतून कोणत्याही देशाला आपल्यासोबत जोडू शकतो. असे घडू शकते, असेही माधव यांनी स्पष्ट केले. रा. स्व. संघाचे प्रचारक असलेले माधव पुढे म्हणाले, ‘भारत ही अशी भूमी आहे, की जेथे विशिष्ट जीवन मार्ग, विशिष्ट संस्कृती किंवा सभ्यतेचे आचरण केले जाते. आम्ही त्याला हिंदू असे संबोधतो. याला तुमची काही हरकत आहे काय? भारताची एकच संस्कृती, आम्ही एक आहोत, आम्ही एक राष्ट्र आहोत. आरएसएस ही संघटना एक विचारधारा असून ती ‘फॅसिस्ट’ नाही.ही भारताच्या सर्वाधिकारासाठी आहे आणि ही संघटना वा आक्रमक नाही.’राम म्हणाले, सरकारला बदनाम करण्यासाठी पुरस्कार वापसीवाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात लेखक व साहित्यिकांनी पुरस्कार परत केले आहेत. याबाबत विचारले असता माधव म्हणाले, काही मूठभर लोक संपूर्ण देशाच्या मताचे प्रतिनिधित्व करीत नसतात आणि पुरस्कार परत न करणाऱ्या व या पुरस्कार वापसीला पाठिंबा न देणाऱ्या साहित्यिक व लेखकांची संख्या मोठी आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी ही पुरस्कार वापसी आहे. एकप्रकारे हे लोक आपल्या चुकीच्या विरोध प्रदर्शनाने भारताला बदनाम करीत आहेत. राम उवाच:माधव यांचे हे वक्तव्य असलेला कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या लाहोर भेटीच्या पूर्वीच लंडनमध्ये रेकॉर्ड करण्यात आला होता; पण हा कार्यक्रम शुक्रवारी रात्री उशिरा दाखविण्यात आला.
भारत व पाकिस्तान पुन्हा एक होतील
By admin | Published: December 27, 2015 2:42 AM